शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:23 IST)

‘या’ महापालिकेतील 80 कर्मचारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, 5 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा पन्नास हजाराच्यावर गेली आहे. राज्यात विदर्भात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. यात अमरावतीमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना काळात काम करत असताना अमरावती महानगर पालिकेतील 80 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर पाच कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
अमरावती महानगर पालिकेत कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. कोरोना झालेल्यांमध्ये डॉक्टर आणि अभियंत्यांसह सर्व पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अमरावती महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 3 हजार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय खासगी स्वरुपात काम करण्यासाठी कर्मचारी कामावर घेण्यात आले आहेत.
 
विद्यापीठात 45 जण पॉझिटिव्ह
अमरावती महानगर पालिकेतील 80 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले असताना संत गाडगेबाबा विद्यापीठातील 45 कर्मचारी कोरोना संक्रमीत झाले आहेत. त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विद्यापीठात मागील आठवड्यात सर्व कर्मचाऱ्यांची सामूहिक कोरोना चाचणी करण्यात आली होती. याचा अहवाल आला असून यामध्ये 45 कर्मचारी तर त्यांच्या कुटुंबातील 14 सदस्य असे एकूण 59 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात 60 कर्मचारी पॉझिटिव्ह
अमरावती जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या ही झपाट्याने वाढत असतानाच अमरावती जिल्हा दंडाधिकारी प्रशासकीय कार्यालयात 60 पेक्षा अधिक कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. कार्यालयात काम करणारे 60-65 कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात 200 कर्मचारी कार्यरत आहेत.