शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (20:33 IST)

८७ वर्षीय वृद्धने कॅन्सरला हरवले, यशस्वी झाली तीन तास गुंतागुंतीची शस्रक्रिया

operation
मनात सकारात्मकता, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुटुंबियांची साथ असेल तर कुठल्याही आजारावर मात करणे शक्य होते असे म्हटले जाते. याच उक्तीचा प्रत्यय नाशिकमधील एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूट मध्ये आला. कोपरगाव येथील ८७ वर्षीय कर्करोगग्रस्त वृद्ध रुग्णावर गुंतागुंतीची शस्रक्रिया करण्यात येथील कर्करोग तज्ञांना यश आले आहे. विशेष म्हणजे शस्रक्रीयेच्या  दुसऱ्याच दिवशी या रुग्णाने फेरफटका मारत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला.

अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ८७ वर्षीय अजीज मन्सुरी यांना गेल्या काही दिवसांपसून खोकल्याचा त्रास होता. अनेक ठिकाणी त्यांनी वैद्यकीय उपचार केले मात्र निदान झाले नाही. काही दिवसांनी त्यांच्या खोकल्यातून रक्तादेखील पडत असल्याचे समोर आले. यांनतर मन्सुरी यांच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील एका रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, मन्सुरी यांचे कुटुंबीय एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.

तेव्हा मन्सुरी यांच्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसामध्ये कॅन्सरची गाठ आढळल्याचे निदर्शनास आले. आयुष्यातील अखेरचे दिवस अत्यंत आनंदायी जीवन जगत असतानाच अचानक कॅन्सरची फुप्पुसात गाठ आढळणे मन्सुरी यांच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का होता. त्यातच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीत असल्यामुळे खर्च पेलवेल की नाही याचीही त्यांना धास्ती होती.
 
मन्सुरी यांच्या कुटुंबियांना धीर देत त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार कसे केले जातील यासाठी येथील हॉस्पिटल प्रशासनाने  प्रयत्न केले. रुग्णाला एका फुफ्फुसावर ठेवून दुसरे फुफ्फुस पूर्णपणे बंद करावे लागणार होते. वय आणि शस्रक्रीयेची जागा यामुळे एसएमबीटी हॉस्पीटलमधील डॉक्टरांपुढे मोठे आव्हान असतानाही अतिशय अभ्यासपूर्ण आणि कौशल्याने तब्बल तीन तास अजीज मन्सुरी यांच्यावर यशस्वी शस्रक्रिया करण्यात आली.  
 
१५ दिवसांनी मन्सुरी यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यावेळी ८७ वय वर्ष असतानाही अजीज मन्सुरी यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानत एसएमबीटीच्या डॉक्टरांनी मला पुनर्जन्म दिल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. धुम्रपान हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्यामागील महत्वाचे कारण आहे.  फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे जवळपास ८० टक्के मृत्यू होतात असे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
कॅन्सरबद्दल फारसे काही माहिती नव्हते. दोन महिन्यांपूर्वी काकांना कॅन्सर असल्याचे समजले. नाशिकला चेकअप करून एसएमबीटीत दाखल केले. परिस्थिती हलाखीची होती मात्र योजनेत बसल्यामुळे संपूर्ण उपचार मोफत झाला. रुग्णालयातील डॉक्टरांसह सर्वांनीच खूप चांगली साथ आम्हाला दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
- अझहरुद्दीन मन्सुरी, रुग्णाचे नातेवाईक.
 
रुग्णाचे वय आणि शस्रक्रियेची जागा बघता मोठी रिस्क होती. रुग्णावर थोरॅसिक सर्जरी व लोबेक्टॉमी सर्जरी करून रुग्णाला एका फुफ्फुसावर ठेवून दुसरे फुफ्फुस पूर्णपणे बंद करावे लागले. दुर्दम्य इच्छाशक्ती, सकारात्मकता, उपचारांना दिलेला प्रतिसाद यामुळे रुग्णावर तीन तासांची शस्रक्रिया यशस्वी झाली. दुसऱ्याच दिवशी रुग्णाने वार्डमध्ये फेरफटका मारला.

- डॉ अल्ताफ सय्यद, कर्करोग तज्ञ एसएमबीटी कॅन्सर इन्सिट्यूट
 
 
Edited by - Ratnadeep Ranshoor