शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 17 जून 2022 (22:30 IST)

सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी केले गजाआड; दोन गावठी पिस्तूलसह, काडतुसे व ५३ हजाराची रोकड जप्त

jail
भगूर परिसरात सहा जणांच्या टोळक्यास पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत संशयितांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे आणि ५३ हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. प्रशांत नानासाहेब जाधव (२५ रा. देवळाली गाव), आतिश कैलास निकम (२५ रा. रोकडोबा वाडी, देवळाली गाव), सागर किसन कोकणे (२४ रा. चेहडी पंपिंग, ना.रोड), रोहन संजय माने (२१ रा. गायकवाड मळा, ना.रोड), रेहमान जाफर शेख (२२ रा. राजवाडा, देवळाली गाव) व गौरव बाळासाहेब फडोळ (२२ रा. सुभाष रोड, ना.रोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
गस्तीपथकांसह गुन्हे शोध पथकांना सतर्क करीत पोलिसांनी विजयनगर येथील सम्राट हॉटेल भागात छापा टाकल्यानंतर हे आरोपी सापडले. या संशयितांच्या अंगझडतीत दोन गावठी कट्यांसह तिन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल मिळून आला असून ते पिस्तूल खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी या ठिकाणी जमल्याचा अंदाज बांधला जात आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कुंदन जाधव यांना गुरूवारी मध्यरात्री खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.