तरूणाकडून वयोवृध्द महिलेवर अत्याचार; न्यायालयाने 12 वर्षे सक्तमजुरी ठोठावली
वयोवृध्द महिलेवर अत्याचार करणारा तरूण राजेंद्र दशरथ दुसुंगे (वय 30 रा. वारूळवाडी ता. नगर) याला न्यायालयाने 12 वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतिश पाटील यांनी काम पाहिले.
या घटनेमध्ये 22 जुलै 2017 रोजी वयोवृध्द महिला मिरावली बाबा दर्गा (ता. नगर) येथे देवदर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी दोन दिवस तेथील रूममध्ये मुक्काम केला. 24 जुलै 2017 रोजी देवदर्शन घेतल्यानंतर त्या घरी जाण्यासाठी निघुन मंदिराच्या जवळील हार फुलांच्या दुकानाजवळ आल्या. त्यावेळी राजेंद्र दुसुंगे याने त्या महिलेस त्याच्या दुचाकीवर बसविले. काही अंतरावर गेल्यानंतर राजेंंद्रने दुचाकी थांबविली व महिलेला एका मोठ्या खड्ड्यामध्ये फरफटत ओढत नेले. जीवे ठार मारण्याची धमकी देवुन तिच्यावर शारिरीक अत्याचार केला होता. त्याठिकाणी शेळ्या चारणारी एक महिला आली असता राजेंद्रने तिलादेखील धमकी दिली होती.
राजेंद्र याने महिलेकडील मोबाईल व पिशवीतील पैसे बळजबरीने काढून घेतले. सदर घटनेनंतर पीडित महिला बेशुध्द झाली. पिडीत महिलेवर येथील जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले. रुग्णालयात पिडीत महिलेचा जबाब नोंदविल्यानंतर आरोपीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भादंवि. कलम 376, 394, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर पिडीत महिलेस उपचारासाठी पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. डी. करेवाड यांनी केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.