सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 जून 2021 (15:57 IST)

बीड मधील खुनातील आरोपीला नाशिकमध्ये अटक

बीड मधील सराफी व्यावसायिकाचा खून करून फरार झालेल्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने नाशिकरोड येथील अरिंगळे मळ्यातून ताब्यात घेतले आहे.ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड (वय 21, रा. वारे गल्ली, शिरूरगाव, ता. शिरूर, जि. बीड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विशाल कुलथे यांचे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे आर्वीकर सुवर्णकार नावाचे सराफी दुकान आहे. संशयित ज्ञानेश्वर गायकवाड याने विशाल कुलथे यांना सोन्याचे दागिने बनविण्यासाठी ऑर्डर दिली होती. 20 मे 2021 रोजी विशाल कुलथे हे ज्ञानेश्वर गायकवाडच्या गाडीवर बसून सोन्याची ऑर्डर असलेले दागिने असलेली बॅग घेऊन गेले होते. त्या नंतर ते परतलेच नाही. नंतर 21 मे रोजी कैलास कुलथे यांनी त्यांचा भाऊ विशाल हे बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. 22 मे रोजी एका दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता विशाल हे ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या मोटारसायकलवर गेल्याचे समजले. पुढे तपास करतांना गायकवाडने आपल्या साथीदारांसह कट रचून विशालला मोटारसायकलवर पळवून नेट त्याच्या ताब्यातून 11 तोळे सोन्याचे दागिने व 4 किलो चांदीचे दागिने असे एकूण 8 लाख 37 हजार 800 रुपयांचे दागिने लुटून त्याला ठार करून त्याचे प्रेत बहातपुरगाव येथे नेऊन पुरल्याचे तपासात निष्पन्न झाले. तेव्हा पासून ज्ञानेश्वर फरार झालेला होता. तो सध्या नाशिकमध्ये असल्याची गुप्त माहिती बीड येथील उपविभागीय अधिकारी विजय लंगारे यांना मिळाली. त्यांनी त्वरित पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांच्याशी संपर्क साधून गायकवाड नाशिकरोड येथील अरिंगळे मळ्यात असल्याचे सांगितले. गायकवाड बाबत कोणतीच माहिती नसतांना गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अरिंगळे मळ्यात पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी त्याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
 
ही कामगिरी पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त संजय बारकुंड, सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सपोनि रघुनाथ शेगर, दिनेश खैरनार, पोलीस अंमलदार रवींद्र बागुल, नझीम पठाण, दिलीप मोंढे, विशाल काठे, फाय्याज सय्यद, महेश साळूखे, असिफ तांबोळी, विशाल देवरे, निलेश भोईर, व महिला पोलीस प्रतिभा पोखरकर आदींनी कामगिरी बजावली. पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखा एक च्या अधिकारी, अंमलदार यांचे कौतुक केले.