बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (16:01 IST)

दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश देणार

येत्या 20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी शासनाने नियमावली जाहीर केली आहे. तरीही वारकरी पायी वारीचा आग्रह धरत आहेत. अशातच पंढरपूरच्या नगराध्यक्षांनी दोन डोस झालेल्या वारकऱ्यांना पंढरपुरात प्रवेश देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी पंढरपूरमध्ये प्रवेश करताना वाखरी येथे सर्व वारकऱ्यांचे दोन डोस झालेले प्रमाणपत्र तपासूनच पंढरपूरमध्ये प्रवेश दिला जाईल, असं नगराध्यक्षा साधना भोसले  यांनी सांगितले.
 
यंदाही या वारीवर कोरोनाचे सावट आहे. पालखी मार्गावर येणाऱ्या अनेक गावांनीदेखील पायी वारीला विरोध केला आहे. सगळ्यात शेवटचं गाव असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क पायीवारी काढल्यास वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करणार असल्याचा इशारा दिला आहे. यानंतर आता पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधनाताई भोसले यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, ज्या वारकऱ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत, अशाच वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा. पंढरपूरमध्ये सध्या 555 जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. 24 हजार 731 जणांना आजपर्यंत संसर्ग झालेला आहे. तर 480 जणांनी आतापर्यंत जीव गमावला आहे. यामुळे अद्यापही नागरिकांत कोरोनाबद्दल भीती आहे.