बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 जून 2021 (15:51 IST)

कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. तसंच कोल्हापूरकरांनी सहाकार्य करावं असं आवाहन देखील अजित पवार यांनी केलं.
 
निर्बंधाच्या बाबत कोल्हापूर चौथ्या टप्प्यात मोडतो. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण कोल्हापुरात आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथिल केले जाणार नाहीत. उलट काही बाबतीत कोणी नियम पाळत नसतील तर नियम अधिक कडक केले जातील असा इशारा अजित पवार यांनी दिला. कोल्हापूर जिल्हा यातून बाहेर पडावं यासाठी काही काळ निर्बंध सोसावे लागतील. कोल्हापूरकरांनी यासाठी सहकार्य करावं, असं आवाहन अजित पवार यानी केलं.
 
अजित पवार यांनी कोरोना परिस्थितीचा आढावा घेणारी भेटीत काय काय ठरलं याची माहिती दिली. गृहविलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने उत्तम काम केलं. कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या संख्येनं रुग्णसंख्या असणाऱ्या गावातील सर्वांच्या चाचण्या करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरातील कोरोना चाचणीचं प्रमाण दीडपट, दुपटीनं वाढवण्यास सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.