गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (08:49 IST)

अजित पवार बंड : शरद पवार आयुष्यातलं सर्वात मोठं राजकीय आव्हान कसं पेलतील?

Ajit Pawar Rebellion  अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये शरद पवारांनी जाहीर केलं इतर काहीही प्रयत्न करण्यापेक्षा ते जनतेच्या न्यायालयात जाऊन त्यांना सिद्ध करतील.
 
ते दुस-या दिवशी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर निघालेही. कराडला गेले आणि मग तिथून साता-याला गेले.
 
2019 मध्ये साता-यात पवारांनी भर पावसात केलेली सभा गाजली होती. तिथे राष्ट्रवादीसाठी निवडणूक फिरली. प्रश्न आता हा आहे, तेच 2023-24 मध्ये पवार पुन्हा करु शकतील का?
 
असं नाही की पवारांच्या राजकीय आयुष्यात अशा प्रकारचे प्रसंग कधी आले नाहीत. स्वत: त्यांनीच वारंवार अशा प्रसंगांबद्दल सांगितलं आहे.
 
अगदी 1 तारखेच्या पत्रकार परिषदेमध्येही त्यांनी अशा प्रसंगांचा उल्लेख केला. 'पुलोद'चं सरकार कोसळल्यावर नंतरच्या काळात त्यांचे समर्थक आमदार दूर गेले होते आणि बोटावर मोजता येतील एवढेच सोबत राहिले होते.
 
1998 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर पवार जरी महाराष्ट्रातले कॉंग्रेसचे सर्वात मोठे नेते असले तरीही बहुतांश सहका-यांनी त्यांची साथ न देता कॉंग्रेसमध्येच राहण्याचं ठरवलं होतं.
 
पवारांना निवडक सहका-यांसोबत शून्यातून पक्ष उभारावा लागला.
 
2019 च्या निवडणुकीअगोदर मधुकर पिचडांसारखे उभं आयुष्य पवारांसोबत राजकारणात घालवलेले सहकारी गेले होते. बाहेर पडणा-यांची जणू रांगच लागली होती. पण तरीही राष्ट्रवादीचे 52 आमदार निवडून आले आणि 'महाविकास आघाडी' करुन पक्ष सत्तेत आला.
 
त्यामुळे शरद पवार जरी म्हणत आहेत की त्यांना ही स्थिती नवीन नाही आणि त्यांनी मैदानावरची लढाई सुरु केली असली तरीही, या वेळी समोर असलेली लढाई इतिहासात अगोदर घडलेल्या प्रसंगांपेक्षा अवघड आहे.
 
काहींनी हे पवारांच्या आजवरच्या राजकीय आयुष्यातली सर्वात कठीण आव्हान असं म्हटलं आहे.
 
वयाचा विचार करता शरद पवार कधीही थकत नाहीत आणि आजही जमिनीवरच्या कार्यकर्त्याप्रमाणे फिरतात याचा कायम उल्लेख केला जातो. '
 
मी अजून म्हातारा झालो नाही' असं त्यांनी वारंवार ठणकावून सांगितलं आहे. आम्ही म्हणूनच पुन्हा शून्यातून उभारण्याची घोषणा त्यांनी केली.
 
पण तरीही उतारवयात पवारांच्या वाट्याला आलेल्या या संघर्षाचं स्वरुप अगोदरच्या परिस्थिती पेक्षा अनेक कारणांसाठी जास्त अवघड आहे. देशाचा, महाराष्ट्राचा राजकीय सारीपाट बदलला आहे.
 
बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे पवारांना कायम 'तेल लावलेल्या पैलवाना'ची उपमा दिली आहे जो प्रतिस्पर्ध्याच्या पकडीतून निसटून जातो. याही वेळेस शरद पवार असेच या पेचप्रसंगातून सुटतील का? या वेळेस जो डाव पडला आहे त्याला अनेक कंगोरे आहेत.
 
समोर अजित पवार आहेत
यंदाचं आव्हान कठीण यासाठी आहे कारण समोर अंतिम निर्णय घेतलेले अजित पवार आहेत. अजित पवारांचं बंड करणं, मतभिन्नता असणं, हे काही नवीन नाही. हे यापूर्वीही झालं आहे.
 
राष्ट्रवादीतला अजित पवारांबरोबरचा सुप्त संघर्ष, अजित पवारांची राजकीय महत्वाकांक्षा ही शरद पवार पहिल्यापासून हाताळत आले आहेत. ते त्यांच्यासाठी नवीन नाही.
 
या पूर्वी अनेकदा त्यांनी अजित पवारांचं बंड हे पेल्यातलं वादळ ठरवलं आहे. कॉंग्रेससोबतच्या आघाडीच्या सरकारमध्ये सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन अजित पवारांनी एका प्रकारचं छोटं बंडच केलं होतं. पण कालांतरानं शरद पवारांनी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात आणलं होतं.
 
2019 मध्ये पहाटेचा शपथविधी देवेंद्र फडणवीसांसोबत करुन तर अजित अजित पवारांनी मोठा भूकंप घडवून आणला होता.
 
'महाविकास आघाडी'चे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर करुन बसलेल्या शरद पवारांविरुद्ध ते उघडपणे जाणं होतं. पण तेव्हा अजित पवार एकटेच गेले होते आणि ते बंड काही तासातच विरघळलं होतं.
 
अगदी काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या भाजपासोबत जाण्याच्या बातम्या आल्या होत्या तेव्हाही पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ते काही काळ लांबवलं.
 
पण अखेरीस ते घडलं, जे होणार याचा सगळ्यांना अंदाज होता. अजित पवारांसह राष्ट्रवादीचा एक गट भाजपासोबत जाण्यास पहिल्यापासून तयार होता पण शरद पवारांचा विचारधारेच्या मुद्द्यावर त्याला विरोध होता, हे स्पष्ट होतं.
 
पण आता ज्या प्रकारे अजित पवारांनी निर्णय घेतला आहे, ते पाहता, पूर्वीसारखा तो परत फिरवण्याचा पर्याय उपलब्ध आहे असं दिसत नाही. शिवाय पक्षावर दावा सांगून अजित पवारांनी त्यांची दिशा स्पष्ट केली आहे.
 
त्यामुळे इतके दिवस जो पक्षांतर्गत सुप्त संघर्ष होता, तो आता बाहेर उघड्या मैदानावरचा जाहीर संघर्ष झाला आहे. हे अगोदर झालं नव्हतं. त्यामुळे आता दोन्ही पवार एकमेकांना कशी उत्तरं देणार हे महत्वाचं आहे.
 
अजित पवार यंदा एकटे नाहीत. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ ही कधीही पवारांना सोडूच शकणार नाहीत असे सहकारीही आता अजित पवारांसोबत आहेत.
 
अजित पवार शरद पवारांच्या तालमीतच तयार झाले आहेत. अनेक वर्षं महाराष्ट्राची पक्षसंघटना प्रदेशाध्यक्ष झाले नाहीत तरी तेच पाहात आहेत. त्यांना मानणारा पक्षामध्ये, आमदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये मोठा वर्ग आहे. तो वर्ग अजित पवारांनाच उत्तराधिकारी मानतो.
 
दिल्लीत सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार ही रचना शरद पवारांनीच पहिल्यापासून केली असल्यानं अजित पवारांची राज्यावरची हुकुमत तयार झाली. त्यामुळे यंदा समोर असलेले अजित पवार कठीण आव्हान शरद पवारांसमोर उभं करतात.
 
कुटुंबातलाही प्रश्न
शरद पवार आणि अजित पवारांच्या संघर्षाकडे कायम पवार कुटुंबातलाही प्रश्न म्हणून बघितलं गेलं आहे. काका आणि पुतण्याच्या वादात महाराष्ट्रात इतर राजकीय घराणी दुभंगण्याची वेळ आली, पण पवारांच्या कुटुंबात तसं झालं नाही. पण आता अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेनं इथं काय होईल हाही प्रश्न आहे.
 
ज्यावेळेस अजित पवारांनी 2019 मध्ये बंड केलं होतं तेव्हा सुप्रिया सुळेंनी 'पार्टी स्प्लिट, फॅमिली स्प्लिट' असा स्टेटस ठेवून आपली भावनिक प्रतिक्रिया दिली होती. पण आता या बंडानंतर सुप्रिया सुळेंनी संयमित प्रतिक्रिया दिली आहे.
 
पक्ष आणि कौटुंबिक संबंध वेगळे आहेत आणि अजित पवार कायमच माझे 'दादा' राहतील असं त्यांनी म्हटलं आहे. पण अजित पवारांचं बंड एकाच कुटुंबातल्या पुढच्या पिढीतल्या प्रतिनिधीनं केलं आहे, हे चित्र आहेच. म्हणूनच इतर राजकीय पेचांपेक्षा हा पेच वेगळा आहे.
 
शिवाय आता या कुटुंबातले राजकारणात असलेले सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे शरद पवारांसोबत आणि अजित पवार हे विरोधात, असंही चित्र वेगळं आहे. याचा परिणाम राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि बारामतीतही होऊ शकतो.
 
राजकारण आणि नातं अशा दोन्ही पातळ्यांवर आता संघर्ष दिसतो आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी यात नात्यांचा संबंध नाही असं स्पष्ट केलं आहे, पण ते तो संबंध अटळ आहे.
 
सोबतच सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड होणं हा शरद पवारांनी वारसदार निवडला अशा अर्थानंच बघितलं गेलं. परिणामी अजित पवारांचं बंड लगेचच झालं. त्यामुळे पक्षाची धुरा सुप्रिया यांच्याकडे जात असतांनाच, ही जबाबदारी त्या घेत असतांनाच, पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.
 
बंधू अजित पवारांनी त्या पक्षावर हक्क सांगितला, हा त्याचा अर्थ. त्यामुळे हा प्रश्न सुप्रिया यांच्या राजकीय भवितव्याचाही होतो.
 
शरद पवारांच्या अलिकडच्या राजकारणाचा आणि जोडलेल्या समीकरणांचा हेतू हा सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न म्हणूनच कायमच महाराष्ट्रात पाहिला गेला. त्यांनी स्वत: यात तथ्य नसल्याचं म्हटलं. पण सुप्रिया यांचं वाढतं महत्व लक्षात घेता तसं होऊ शकतं, ही शक्यता होतीच. पण आता अजित पवारांचा पावलानं सुप्रिया यांच्या राजकीय प्रवासातही आव्हान तयार झालं आहे.
 
त्यामुळे सुप्रियांच्या भविष्यातल्या राजकारणाच्या अंगानं, शरद पवारांसमोर हे राजकीय आव्हान आताच्या स्थितीत तयार झालं आहे. तोच प्रश्न पवार कुटुंबातल्या नव्या पिढीचे राजकारणातले प्रतिनिधी रोहित पवार, ज्यांची पहिलीच आमदारकीची टर्म आहे, त्यांच्याबद्दलही असू शकतो.
 
विश्वासार्हतेचा प्रश्न
आजवर राजकारणात, विशेषत: दिल्लीच्या राजकारणात , ज्याला पवारांचं धक्कातंत्र वा मुत्सद्देगिरी असं म्हटलं जातं, ते कायम विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं असं म्हणून पाहिलं गेलं. जेव्हा अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला तेव्हाही हा प्रश्न आलाच होता. पण स्वत: पवारांनी हे बंड मोडून काढत ती शंका खोटी ठरवली होती.
 
पण आता परिस्थिती या मुद्द्यावरही बिकट आहे. भुजबळ, वळसे-पाटील, प्रफुल्ल पटेल असे जवळचे लोक पवारांनी पाठवल्याशिवाय कसे जातील असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. मुद्दा हा की या घटनवरुनही विश्वासार्हतेचा प्रश्न विचारला जातो आहे. ती सिद्ध करण्याची वेळ परत येणं हेही या सद्य पेचातलं महत्वाचं अंग आहे.
 
सध्या सुरु असलेलं राजकारण पाहता टायमिंगही महत्वाचं आहे. सगळे विरोधक राष्ट्रीय स्तरावर आणि राज्य स्तरावर भाजपाविरोधी मोट बांधत असतांना आणि त्यात शरद पवारांची भूमिका अतिमहत्वाची असतांना, हे विश्वासार्हतेबद्दलचे प्रश्न सोडवणं आवश्यक बनतं.
 
आता शरद पवारांच्या बाजूनं बंडखोरांंवर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. अपात्रतेपर्यंत प्रकरण पोहोचलं आहे. गरज पडल्यास उद्धव ठाकरेंसारखे पवार सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातात का हे पाहणंही महत्वाचं ठरेल.
 
उद्धव ठाकरे अगदी पहिल्या पावलापासून न्यायालयात गेले होते. त्यांच्या स्थितीत आणि आताच्या स्थितीत फरक हाही आहे की उद्धव तेव्हा सरकार वाचवायचाही प्रयत्न करत होते. आता सरकार नाही. त्यामुळे पक्षांतर्गत आणि विधिमंडळातली आयुधं, आणि शेवटी स्वत: पवार म्हणतात तसं लोकांधली लढाई हाच मार्ग आहे.
 
शरद पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले सर्वात मुरब्बी, अनुभवी आणि मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यामुळे ते या पेचप्रसंगातून मार्ग कसा काढतात, तो काढू शकतात का, यावर केवळ त्यांचं, त्यांच्या पक्षाचं राजकारणच अवलंबून नाही तर महाराष्ट्राचं राजकारणही अवलंबून आहे. त्यामुळे हा शरद पवारांच्या राजकीय आयुष्यातलं सर्वात मोठा पेच आहे.
 
जो पक्ष त्यांनी स्थापन केला, त्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षात, तो पक्ष आपल्याकडेच ठेवण्यासाठी आता शरद पवारांची कसोटी सुरु झाली आहे. ज्या नव्या पिढीतलं नेतृत्व त्यांनी राजकारणात तयार केलं याचे दाखले दिले जातात, त्यातलेच आता त्यांना सोडून गेले असतांना, सगळं नव्यानं उभं करण्याच्या प्रयत्नात शरद पवार आहेत.