गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 26 जुलै 2023 (21:53 IST)

अन् कैद्याने कारागृह पोलिसाच्या कानशिलातच लगावली

jail
Nashik News नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने नाशिकरोड पोलीस ठाण्यात संबंधित कैद्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे…
 
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, येथील मध्यवर्ती कारागृहात रुपेश आनंदा पवार हे पोलीस कर्मचारी असून दोन दिवसांपूर्वी ड्युटीवर असतांना साडेतीन वाजेच्या सुमारास कारागृहातील सर्कल क्रमांक आठ मधील कैदी अमर मारुती माळी हा कोणाची परवानगी न घेता क्रमांक सहा मधील सर्कलमध्ये त्याचा कैदी मित्र राहुल सुनील खंडारे यास भेटण्यासाठी आला व बोलू लागला. यावेळी ड्युटीवर असलेल्या रुपेश पवार यांनी माळी यास ‘तू या सर्कलमध्ये कसा काय आला, परवानगी घेतली का? अशी विचारणा केली असता पवार यांच्या बोलण्याचा माळी यास राग आला. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते करा मी जाणार नाही असे बोलून कैदी अमर माळी याने पोलीस कर्मचारी आनंद पवार यांच्या कानशिलात लगावली.
 
दरम्यान, या घटनेनंतर कारागृहातील इतर कैदी आले व त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेप्रकरणी कारागृह पोलीस कर्मचारी रुपेश पवार यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.