बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (18:20 IST)

नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी केलं आहे. कंपनीकडून घेतलेलं 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवली आहे.
 
नितेश राणे आणि त्यांच्या आईच्या नावाने डीएचएफएल कंपनीकडून 40 कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. पण त्यापैकी 25 कोटींच्या कर्जाची परतफेड न करण्यात आल्याने डीएचएफएल कंपनीकडून पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कोर्टाच्या आदेशानंतर लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं आहे. 
 
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.
 
याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न झाल्याने डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.
 
3 सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटीस पाठवली गेली आहे. काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.