1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2023 (09:02 IST)

राज्यात तब्बल अडीच लाख पदे रिक्त

jobs
राज्य सरकार सातत्याने रिक्त जागा भरण्याची भाषा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात भरती प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे राज्यात विविध विभागात आणि जिल्हा परिषदांमध्ये २ लाख ४० हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे मागील ३० महिन्यांपासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये २.४० लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले.
 
महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि जिल्हा परिषदेअंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाले आहे. शासकीय विभाग व जिल्हा परिषदेतील ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली. एकूण २९ शासकीय विभाग आणि जिल्हा परिषद यात मंजूर पदांची संख्या १० लाख ७० हजार ८४० इतकी आहे. यापैकी ८ लाख २६ हजार ४३५ पदे भरलेली आहेत तर २ लाख ४४ हजार ४०५ इतकी पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यात शासकीय कर्मचा-यांची १९२४२५ तर जिल्हा परिषदेच्या ५१९८० अशी एकूण २४४४०५ पदे रिक्त आहेत.
 
माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्य सरकारकडे १४ जून २०२३ रोजी अर्ज सादर करत महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व वर्गातील एकूण पदांची माहिती, मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदांची माहिती मागितली होती. सामान्य प्रशासन विभागाने अनिल गलगली यांना गटनिहाय शासकीय व जिल्हा परिषदेतील गट अ, ब, क आणि ड मधील दि. ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली.
 
Edited By - Ratnadeep ranshoor