गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (11:46 IST)

विधानसभा अधिवेशन दिवस दुसरा :भाजपने विधान भवनाच्या पायऱ्यांवर भरवली अभिरूप विधानसभा

12 आमदारांच्या निषेधार्थ भाजपनं विधान भवनाच्या पायऱ्यांवरच अभिरूप विधानसभा भरवली आहे.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. पण विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहातल्या कामकाजावर बहिष्कार घालत पायऱ्यांवर बसत अभिरूप विधासभा भरवली आहे.
काल विरोधीपक्षाच्या आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं,त्याचा निषेध करण्यात येतोय.
 
सभागृहात जे घडलंच नाही,अशा काहीतरी धादांतपणे खोट्या गोष्टीसांगून आमदारांना निलंबित केलं जात आहे. त्यामुळं विधानसभेत सरकारच्या निषेधाचा प्रस्ताव ठेवत असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या पायऱ्यांवर भाषण करताना म्हणाले.
 
तर विरोधकांशिवाय सभागृहाचं कामकाज सुरू झालेलं आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अधिवेशनाआधीच्या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते.अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी मौन बाळगलं.दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री बोलणार का? याकडेही लक्ष आहे.
 
आमदारांच्या निलंबनाच्या मुद्यावरून दुसऱ्या दिवशीचं कामकाजही तापलेलं राहण्याची शक्यता आहे.
 

सोमवारी नेमकं काय घडलं होतं?
 
केंद्र सरकारनं राज्याला मागासवर्गाची माहिती त्वरीत उपलब्ध करून द्यावी,अशी शिफारस करणारा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी विधिमंडळात मांडला.
 
याला विरोध करताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं,"हा प्रस्ताव आला तर विरोधीपक्ष त्याला पाठिंबाच देईल. पण यातून काही साध्य होणार नाही.हा राजकीय प्रस्ताव आहे."
 
तर,ओबीसी आरक्षणाचा ठराव हा आरक्षण देण्यासंदर्भात करण्यात यावा.पण हा ठराव जनतेत संभ्रम निर्माण करण्यासाठी करण्यात आला आहे,असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
 
त्यानंतरओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून अध्यक्षांच्या दालनात धक्काबुक्की केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला.
 
भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना हा प्रकार घडल्याचं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं.
 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावले.
 
त्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं.संजय कुटे,आशिष शेलार,जयकुमार रावल,गिरीश महाजन,अभिमन्यू पवार, हरिष पिंपळे, राम सातपुते,जयकुमार रावल,पराग अळवणी,नारायणे कुचे,बंटी भांगडीया,योगेश सागर या बारा आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.एका वर्षासाठी त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
 

त्यानंतर या बारा आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
 
भाजप आमदारांच्या निलंबनाचं षडयंत्र रचण्यात आलं.राज्यपालांनी घडलेल्या घटनाचा अहवाल मागवावा,अशी मागणी केल्याचं भाजप आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.ठाकरे सरकारने लोकशाही मूल्यांची हत्या करून प्रेतयात्रा काढली असंही ते म्हणाले.
 
मंत्रीमहोदयांनी दाखवलेला व्हीडिओ पाहिला तर लक्षात येतं की आमच्यापैकी कोणीही अपशब्दांचा वापर केलेला नाही.आम्ही या कारवाईचा निषेध करतो,असा दावासुद्धा त्यांनी केला.