गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 जून 2020 (08:21 IST)

महिला शक्ति बँक सखींनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही केले दोन कोटी रुपयांचे व्यवहार

नागपूरमधील  बचत गटाच्या बँक सखींनी ‘लॉकडाऊन’च्या काळातही ग्रामीण भागातील महिलांना बँकेत पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार अत्यंत सुलभपण सुरु ठेवले आहेत. मागील तीन महिन्यात 6 हजार 605 खातेदारांना तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँक व्यवहार पॉस मशिनच्या सहाय्याने पूर्ण केला आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती ‘उमेद’अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहायाने बचत गटाच्या बँक सखींनी बॅंकेचा व्यवहार पूर्ण करुन ग्रामीण भागातील बँकेच्या खातेदारांना मदत केली आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळातील सामाजिक अंतर ठेवत तसेच सॅनिटायझरचा वापर करुन ग्रामीण जनतेला बँकेच्या सेवा सहज आणि सुलभ पणे उपलब्ध करुन दिल्या आहेत.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील महिलांना बँकेच्या व्यवहारासाठी शहरापर्यंत जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातच काम करणाऱ्या ‘उमेद’च्या  बी.सी. सखींनी बँकेचे व्यवहार करुन मागील तीन महिन्यात तब्बल 2 कोटी 15 लक्ष 90 हजार रुपयांचा बँकिंग व्यवहार यशस्वीपणे पूर्ण केला आहे. 
 
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ‘उमेद’अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बचत गटाच्या सदस्यांची बी.सी. सखी म्हणून निवड केल्या जाते. निवड केलेल्या सख्यांना बँकिंग व्यवहाराबाबत प्रशिक्षण दिल्यानंतरच संबंधित बँकेच्या शाखेमार्फत गावातील खातेदारांना बँकेतून पैसे काढणे व जमा करणे आदी व्यवहार करण्याची परवानगी दिली जाते.