भीमा-कोरेगावचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे : नितीन राऊत
“महाविकास आघाडी सरकार भीमा-कोरेगावातील विजयस्तंभ या प्रेरणास्थळाचा विकास करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल. त्यासाठी या स्थळाचा ताबा राज्य सरकारकडे येणे गरजेचे आहे. त्यासंदर्भातील कायदेशीर लढाई मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहे. ही लढाई अधिक प्रभावीपणे लढता यावी म्हणून सरकारच्यावतीने विशेष वकील नेमण्यासाठी, राज्य सरकारने आपली बाजू प्रभावीपणे दिलेल्या तारखांना न चुकवता मांडली जावी, यासाठी सरकारमधील एक मंत्री म्हणून आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक सच्चा अनुयायी म्हणून मी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे,” असं आश्वासन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भीमा कोरेगाव येथे दिले.
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना दिली. यानंतर त्यांनी वढु बु., तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देत अभिवादन केले.
“भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती आणि या समितीचे प्रमुख दादासाहेब अभंग हे गेले दोन दशके सतत संघर्ष करीत आहेत. त्यांच्या या संघर्षाला महाविकास आघाडी सरकारची पूर्ण साथ लाभेल, अशी ग्वाही मी या निमित्ताने देतो. या परिसराचे सौंदर्यीकरण असो की या विजयस्तंभाच्या इतिहासाला त्या मागील समाजकारणांना साजेसे दालने, संग्रहालय येथे उभारणे गरजेचे आहे,” असं मत त्यांनी मांडलं;