सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 जून 2021 (23:27 IST)

शरद पवार नरेंद्र मोदीं विरोधात आघाडी उभी करू शकतील का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्या (22 जून) दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलवली आहे.
 
गेल्या दहा दिवसांत शरद पवार यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचीही दोन वेळा भेट घेतली. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार विरोधकांना एकत्र करत तिसरी आघाडी उघडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
या बैठकीला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, यशवंत सिन्हा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दूल्ला, संजय सिंह, डी.राजा, के.टी.एस. तुलसी, संजय झा या नेत्यांना आमंत्रण आहे.
 
न्यायमूर्ती ए.पी.सिंह, करन थापर, जावेद अख्तर, सुधींद्र कुलकर्णी, के.सी.सिंह, के.टी.एस. तुलसी, संजय झा, इ. नेते, अर्थतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारही बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाच्यादृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
 
या बैठकीपूर्वी त्यांनी आज (21 जून) राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची दिल्ली येथे भेट घेतली. गेल्या दहा दिवसांत शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात दोन वेळा चर्चा झाली आहे.
 
ही बैठक महत्त्वाची का आहे?
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे यश आणि नरेंदी मोदी यांना पर्याय उभा करण्याच्यादृष्टीने देशातील विरोधकांनी एकत्र येणं ही राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड असल्याचं जाणकार सांगतात.
 
11 जून रोजी प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली होती.
 
प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल निवडणुकांमध्येही राजकीय रणनीती आखण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यामुळे आगामी 2024 लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार तिसरी आघाडी उघडणार असल्याचीही चर्चा सुरू आहे.
 
नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (22 जून) सकाळी साडे अकरा वाजता शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक होणार आहे.
 
नवाब मलिक यांनी सांगितलं, "संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत."
 
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीबाबत त्यांच्याकडील माहिती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
 
मलिक पुढे म्हणाले, "उद्या (22 जून) मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत."
 
"वर्षाअखेर उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी टायमिंग साधलं आहे," असं राजकीय विश्लेषक व्यकंटेश केसरी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
 
काँग्रेसला बैठकीतून वगळले?
या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली. पण काँग्रेसला या बैठकीत बोलवण्यात आलं नसल्याचे समजते.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. ते म्हणाले, "याआधी सुद्धा शरद पवार यांनी विरोधी पक्षाची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. ही चांगली गोष्ट आहे. पण पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारवेळी ते आम्हाला काही महिने आधीच सोडून गेले होते. पण त्यांचे प्रयत्न सुरू राहू देत."
 
काँग्रेसला बैठकीसाठी बोलवलं नाही याचा अर्थ काँग्रेसला वगळलं असा होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं.
 
व्यंकटेश केसरी सांगतात, "भाजपचा सर्वात मोठा विरोधक काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे आज ना उद्या काँग्रेस यात सहभाग घेणार. यात काँग्रेसला वगळता येणार नाही हे सुद्धा वास्तव आहे. नाही म्हटलं तरी काँग्रेसचे 50-55 खासदार असणार आहेत. तसे नाही झाले आणि विरोधकांमध्ये विभाजन झाल्यास त्याचा फायदा भाजपला होणार."
 
महाराष्ट्रात काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केली आणि भाजपला सत्तेपासून दूर केले. "त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भाजपविरोधी आघाडीत येण्याशिवाय काँग्रेसला गत्यंतर नाही." असं ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात.
 
 
तिसरी आघाडी उघडणार?
शरद पवार यांनी यूपीएचे नेतृत्व करावं अशी अनेक राज्यातील पक्षांची इच्छा असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सुद्धा शरद पवार यांना भाजपविरोधी प्रचारासाठी बोलवलं होतं.
 
तेव्हा शरद पवार राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधी आघाडीसाठी पुढाकार घेण्याची शक्यता वर्तवली जात होती.
 
22 जून रोजी होणाऱ्या बैठकीत किती विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात? विविध राज्यांचे समविचारी पक्ष एकत्र येऊन रणनीती कशी आखतात? या पक्षांचा किमान समान कार्यक्रम काय असेल? याची चाचपणी होऊ शकते.
 
राजकीय विश्लेषक व्यकंटेश केसरी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने पर्याय देणं अपेक्षित होतं पण तसं घडताना दिसत नाही. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्येही काँग्रेसच्या हाती पराभव आला. त्यामुळे भाजपविरोधात विरोधकांनी एकत्र येणं गरज बनली आहे. यामुळेच कदाचित शरद पवार यांनी पुढाकार घेतला असावा."
 
यूपीए भाजपची सर्वात मोठा विरोधी आघाडी असली तरी ती अपेक्षेप्रमाणे सक्रिय दिसत नाही. त्यात काँग्रेसमधील अंतर्गत कलह वारंवार चव्हाट्यावर आल्याने पक्षात गोंधळाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.
 
सुनील चावके सांगतात, "तिसऱ्या आघाडीची गरज भासते कारण यूपीएचे नेतृत्त्व काँग्रेस करत आहे आणि यूपीए आता अत्यंत मोजक्या राज्यांत आहे. त्यात काँग्रेसमध्ये अंतर्गत गोंधळ आहे. तेव्हा काँग्रेससाठी किती काळ थांबणार? असाही प्रश्न विरोधकांसमोर आहे. त्यासाठी तिसऱ्या आघाडीचा हा प्रयत्न असू शकतो."
 
"मोदी सरकारविरोधात विरोधक आक्रमक दिसले पाहिजेत. काँग्रेस काही करत नाही त्यामुळे किती दिवस बसून राहणार या हेतूने ही तयारी दिसते. ही फक्त सुरुवात आहे. ही आघाडी पुढे कसा आकार घेते हे पहावे लागणार आहे," असं चावके यांनी पुढं म्हटलं.
 
शरद पवार यांच्या विश्वासाहर्तेवर प्रश्न?
2014 साली महाराष्ट्रात भाजप सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला बाहेरून पाठिंबा देत असल्याचं म्हटलं गेलं. तर केंद्रात सुद्धा शरद पवार यांच्या तटस्थ भूमिकेमुळे अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले. कृषी कायद्यांसंदर्भातही शरद पवारांची भूमिका संदिग्ध असल्याची टीका करण्यात आली.
 
2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेची बोलणी सुरू असताना अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापनेचा दावा करत पहाटे शपथविधी केला. या घटनेनंतरही शरद पवारांच्या भूमिकांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.
 
याविषयी बोलताना व्यकंटेश केसरी सांगतात, "शरद पवार यांच्या विश्वासाहर्तेवर तीस वर्षांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण त्यांचे राजकारण काय सांगते हे महत्त्वाचे आहे. 2004, 2009, 2014, 2019 या निवडणुकांचा इतिहास काय सांगतो हे महत्त्वाचे आहे."
 
"भाजपपासून केवळ राष्ट्रीय पक्षाला नव्हे तर आता प्रादेशिक पक्षांसमोरही मोठं आव्हान असल्याने आगामी निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध प्रादेशिक पक्ष असाही सामना पहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना भूमिका घ्यावी लागतेय," असंही केसरी यांनी म्हटलं.
 
सुनील चावके सांगतात, "शरद पवार या विरोधकांच्या आघाडीसाठी पुढाकार घेत आहेत कारण शरद पवार सगळ्यांना एकत्र आणू शकतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या नावावर विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात. समविचारी पक्षांना एकत्र ठेवणे हा यामागे हेतू आहे."