शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2020 (13:30 IST)

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी

कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेले योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या विचारांने, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 
कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.