अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरातच होणार : चंद्रकांत पाटील
सोलापूर : सोलापूरसाठी मंजूर झालेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र कुठेही हलवले जाणार नाही. पवारांनी ते बारामतीला पळवून नेलेलं नाही. केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीत होणार आहे, असे स्पष्टीकरण सोलापूरचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारी आदेश वाचून दाखवत दिले.
सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला गेल्याने गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी या केंद्रासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली. मात्र, त्यानंतर त्यांनीही याबाबत मौन पाळले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांनी अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत भाष्य केले.
श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाबाबत सुविधा नसल्याने केवळ प्रशिक्षण केंद्र बारामतीला जाणार आहे. सोलापूरला मंजूर झालेले मूळ केंद्र कुठेही हलवले जाणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी शासकीय आदेश वाचून दाखवत प्राशिक्षण केंद्राबाबत स्पष्टीकरण दिले. हैदराबाद येथील आयआयएमआर या कंपनीने दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी 6 कोटी रुपयांचा निधी नियोजन मंडळातून देण्यास पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. या निधीमुळे गेलेलं प्रशिक्षण केंद्र परत येईल किंवा नव्याने एखादे प्रशिक्षण केंद्र मंजूर होईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, श्री अन्न उत्कृष्टता प्रकल्पाचे प्रशिक्षण केंद्र बारामतीला जावे, असं मी म्हणतच नाही. बारामतीवाल्यांनी विकास करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षे केले आहे. त्यांना जनतेची साथही मिळाली आहे. याचा अर्थ मी अजित पवार आणि शरद पवार यांचे समर्थन करतोय, असं नाही पवारसाहेबांच्या भूतकाळासंबंधी मी बोलणार नाही आणि त्यांनी हे केंद्र पळवून नेलं नाही.
मराठा आरक्षण आंदोलकांनी दबाव निर्माण केला, तेव्हा काही आमदारांनी राजीनामा देतो, असं म्हटलं आणि काहींनी तो दिलासुद्धा. त्याचपद्धतीने आमदार सुभाष देशमुख यांच्यावरही तुम्ही लोकांनी या अन्न उत्कृष्ट केंद्रावरून दबाव निर्माण केला. राजकीय लोकांचा तसा शब्द असतो की, वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ, पण तो द्यायचा नसतो, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगून टाकले.