1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 एप्रिल 2019 (09:55 IST)

एमएचटी-सीईटीच्या परीक्षेवर महा ऑनलाईनद्वारे लक्ष

cet exam
येत्या 2 ते 13 मेदरम्यान होणार्‍या एमएचटी-सीईटीच्या परीक्षेवर आता महा ऑनलाईनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. सीईटी कक्षाकडून घेण्यात येणारी ही सर्वात मोठी परीक्षा आहे. या परीक्षेला राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परीक्षेला बसतात. त्यामुळे परीक्षेदरम्यान कोणताही गोंधळ झाल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवून कार्यवाही करणे शक्य व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सीईटीकडून सांगण्यात आले.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) मेडिकल, लॉ, आर्किटेक्चर या विषयांच्या यशस्वी सीईटी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. 
 
सीईटी सेलकडून 2 ते 13 मेदरम्यान अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयाची घेण्यात येणार्‍या प्रवेश प्रक्रियेला तब्बल 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून 3 लाख 96 हजार 624 जणांनी अर्ज भरले आहेत, तर अन्य राज्यातून 16 हजार 660 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये मध्यप्रदेश (3332), उत्तर प्रदेश (2429) आणि बिहारमधून (1962) सर्वाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही परीक्षा ऑनलाईन देण्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सीईटी सेलकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘ऑफी’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. एमएचटी सीईटी परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.