1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बारामती , मंगळवार, 8 मे 2018 (16:58 IST)

अतिदुर्गम ‘चांदर’मध्ये आता महावितरणच्या प्रकाशाचं चांदणं

सह्याद्री पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या अतिदुर्गम चांदर (ता. वेल्हे, जि. पुणे) अन् लगतच्या दोन वस्त्यांसाठी अवघ्या सातदिवसांत 65 वीजखांब व एका वितरण रोहित्राची वीजयंत्रणा उभारत महावितरणने डोंगरदऱ्यातून अक्षरशः ‘प्रकाश’खेचून आणला आहे. आजवर चांदण्यांच्या टिपूर प्रकाशात राहण्याची सवय असणाऱ्या चांदर गावासह डिगेवस्ती व टाकेवस्तीमधील घरेही महावितरणच्या प्रकाशाने उजळून निघत आहेत.
 
केवळ एका विद्यार्थ्यांसाठी डोंगरदऱ्यातून अडीच- तीन तास प्रवास करून चांदर येथील शाळेत विद्यार्जन करणाऱे शिक्षक रजनीकांत मेंढे यांच्यामुळे अतिदुर्गम चांदर गावाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांद्वारे जगाला मिळाली होती. त्या शाळेलाही महावितरणकडून नवीन वीजजोडणी देण्यातआलेली आहे, हे विशेष.
 
पुणे व रायगड जिल्ह्याच्या सिमेलगत सह्याद्रीच्या घनदाट वनराईच्या डोंगरदऱ्यातील अतिदुर्गम भागात वसलेले चांदर गाव. दोन डोंगराच्या खोल दरीत वसलेले हे 18 घरांचे गाव. बाजूलाच असलेल्या डोंगरमाथ्यावर 10 घरांची टाकेवस्ती व दुसऱ्या डोंगरमाथ्यावर 18 घरांची डिगेवस्ती असा 46 घरांचा परिसर. पुण्यापासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेले व सुमारे साडेचार ते पाच तासांच्या प्रवासाचे चांदर गाव हे पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे शेवटचे टोक. दऱ्याखोऱ्यातील घाटरस्त्याने जाताना शेवटचे 15 किलोमीटर भुसभुशीत माती रस्त्याचे अंतर कापणे चारचाकी वाहनांमध्ये केवळ जिप व तत्सम वाहनांखेरीज केवळ अशक्य आहे. चांदर व लगतच्या दोन्ही वस्त्यांचा पावसाळ्यात तर सुमारे 5 ते 6 महिने जगाशी संपर्क तुटलेला असतो. पण डोंगरदऱ्यातील याच गावात महावितरणने सामाजिक बांधिलकीचे एक नवीन प्रकाशपर्व सुरु केले आहे.
 
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना प्रसिद्धीमाध्यमांद्वारे चांदर गावाची माहिती मिळाली. या गावाला वीजपुरवठा करण्यासाठी आवश्यक व ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक अधिकाऱ्यांनी चांदर गावाची प्रत्यक्षात पाहणी केल्यानंतर अत्यंत नैसर्गिक व भौगोलिक प्रतिकूल परिस्थितीत हे आव्हान किती खडतर आहे याचा अंदाज आला. त्यानंतर 20 एप्रिलला प्रत्यक्षात काम सुरु झाले.
 
महावितरणने हे आव्हान स्वीकारून सामाजिक बांधिलकी जोपासत काम सुरु केले. सुमारे 60 कर्मचारी चांदर परिसरातील डोंगरदऱ्यात वीजयंत्रणा उभारण्याच्या कामी लागले. सकाळी 9 ते रात्री उशिरापर्यंत वीजयंत्रणा उभारण्यासाठी हे सर्वजण राबत होते. अत्यंत खडतर रस्त्याने सर्वप्रथम वीजखांब, तारा व इतर तांत्रिक साहित्य एकाच दिवसात आणल्यानंतर प्रत्यक्ष वीजयंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले. यात डोंगर पायथ्याशी असलेल्या निवंगुणे वस्तीजवळील आडमल 22 केव्ही वीजवाहिनीला जोडून डोंगरमाथ्यापर्यंत सुमारे 900 मीटर व त्यापुढील डिगेवस्तीजवळील सपाट भागापर्यंत नवीन 29 वीजखांब टाकून 22 केव्ही क्षमतेची सुमारे 1.72 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनी पूर्णपणे नव्याने उभारण्यात आली. त्यानंतर डिगेवस्तीजवळच 63 केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र लावण्यात आले. सलग सात दिवसांच्या अविश्रांत कामानंतर 26 एप्रिलला वितरण रोहित्र व उच्चदाब वाहिनी कार्यान्वित झाली. रोहित्राच्या वीजखांबावर रात्री लखलखणाऱ्या दिव्याने चांदर गावासह दोन्ही वस्त्यांना महावितरणने खेचून आणलेला प्रकाश आता घराच्या उंबरापर्यंत येत असल्याची चाहूल दिली. यावेळी ग्रामस्थांनी साखर वाटून आनंद व्यक्त केला.
 
त्यानंतर डोंगरमाथ्यावर असलेल्या या रोहित्रामधून तीन वेगवेगळ्या दिशेला असलेल्या चांदर, डिगेवस्ती व टाकेवस्ती येथे 440 व्होल्टच्या लघुदाब वाहिनीद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात आली. रोहित्राजवळ असलेल्या डिगेवस्तीला 9 खांबावरील वाहिनीद्वारे वीज उपलब्ध करून देण्यात आली. पण हे काम चांदरसाठी सर्वाधिक अवघड ठरले. दुसऱ्या दिशेला सुमारे 1300 मीटर डोंगरदरीत असलेल्या चांदर गावासाठी डोंगर उतारावर एकूण 17 वीजखांब उभारण्यात आले आणि तिसऱ्या दिशेने असणाऱ्या टाकेवस्तीसाठी सुद्धा स्वतंत्र 10 वीजखांब उभारण्यात आले. त्यानंतर या तीनही वस्त्यांसाठी नवीन वीजजोडणी देण्याची कार्यवाही सुरु झाली. विशेष म्हणजे सिमेंट काँक्रिटीकरणासाठी आवश्यक पाण्याचेही दुर्भिक्ष्य असल्याने व टँकर येणे शक्य नसल्याने बॅरलद्वारे पाणी आणावे लागले. ही वीजयंत्रणा उभारण्यासाठी महावितरणला सुमारे 20 लाख रुपये खर्च आला.
 
वीजपुरवठा यशस्वी सुरळीत झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये प्रत्येकी दोन नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यात चांदरमधील प्राथमिक शाळेसह वीजग्राहक दिनाराम सांगळे यांनी पहिल्या वीजजोडणीचा मान मिळविला. टाकेवस्ती येथे बबन सांगळे, तुकाराम बेसावडे यांना तर डिगेवस्ती येथील नथू कोकरे व तिमा कोकरे यांना नवीन वीजजोडणी देण्यात आल्या आहेत. घरात उजळलेले विजेचे दिवे पाहून महावितरणचे हे नवीन वीजग्राहक व त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव व निष्पाप, दिलखुलास हास्यानेच शब्दातीत प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. प्रकाशाच्या आगमनाचा आनंद साखर वाटून साजरा झाला. या वस्त्यांमधील आबालवृद्धांनी घरात विजेवरील दिव्याचा प्रकाश पहिल्यांदाच अनुभवला हेही विशेष.
 
चांदर गाव व दोन्ही वस्त्यांमध्ये 46 पैकी बहुतांश घरे ही कुडाची माती लेपलेली असल्यामुळे वीजमीटर व सर्व्हीस वायर टाकण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणीची प्रक्रिया ही वीजसुरक्षेला प्राधान्य देऊन सुरू आहे. यासोबतच ग्रामस्थांना वीजसुरक्षेबाबतही माहिती देण्यात येत आहे. अतिदुर्गम व डोंगरदऱ्यात चांदर गाव व दोन वस्त्यांमध्ये महावितरणच्या सामाजिक बांधिलकीचे प्रकाशपर्व सुरु केल्याबदद्ल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व पुणे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी या कामी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.