चांदिवाल आयोगाची नोटीस रद्द, मलिकांविरोधात कुठलीही कारवाई करता येणार नाही
चांदिवाल आयोगाने नवाब मलिकांना नोटीस बजावली. मात्र आयोगाने ही नोटीस रद्द करण्याचा निर्णय घेतला. नवाब मलिकांविरोधात कुठलीही कारवाई करता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.
आज नबाव मलिक याप्रकरणी चांदिवाल आयोगात दाखल झाले होते. ते म्हणाले की, १५ तारखेला मला आयोगाने नोटीस बजावली होती. वाझेची तक्रार होती. मी केलेल्या वक्तव्यावर कारवाई झाली पाहिजे, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. मला नोटीस मिळाल्यानंतर त्या नोटीसमध्ये वैयक्तिक हजर राहण्याची गरज नाही असा उल्लेख करण्यात आला होता. तरी मी स्वतः हजर राहिलो. माझे वकील हजर राहिले. आमचे म्हणणे लेखी स्वरुपात आम्ही सादर केले. त्यानंतर आयोगाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर जो अर्ज वाझेनी केला होता, त्याला डिस्चार्ज केले आहे. आमचे म्हणणे होते की, आम्ही कोणत्याही आयोगाच्या सुरू असलेल्या कारवाईवर बोललो नाही. किंवा अनिल देशमुखच्या स्टेटमेंटच्या आधारावर विधान केले नाही. पण वाझे, परमबीर सिंग यांच्या चुका आणि मागे काही केलं असेल किंवा करत असतील यावर मला बोलण्याचा अधिकार आहे. त्यानंतर आयोगाने मला हा अधिकार आहे, हे स्वीकारले. मग मी बोललो नाही, हे पण स्वीकारले आणि वाझेचा अर्ज डिस्चार्ज करण्यात आला.