शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 ऑक्टोबर 2021 (08:09 IST)

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध शाखांच्या प्रथम वर्ष उन्हाळी सत्र परीक्षा मंगळवार (दि. १२) पासून सुरू होणार होत्या. मात्र, या परीक्षेंतर्गत होमिओपॅथी विद्याशाखेच्या प्रथम वर्षाचा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता होणारा पेपार अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र, विद्यापीठाकडून प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या विद्यार्थी अपात्रतेविषयीच्या पत्राचे कारण देत उशिरा प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी पेच निर्माण झाल्याने अशा विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षांना मंगळवार (दि.१२) पासून सुरुवात होऊन या परीक्षा ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार होत्या. मात्र, होमिओपॅथी विद्याशाखेचा मंगळवारी पहिला पेपर सुरू होण्यापूर्वीच विद्यापीठाने ऐनवेळी हा पेपर रद्द करून वेळापत्रकात बदल केला आहे. परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध विद्याशाखांच्या उन्हाळी २०२१ सत्राच्या परीक्षा राज्यातील विविध १७७ परीक्षा केद्रांवर घेण्यात येत आहेत. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मंगळवार (दि.१२) होमिओपॅथी विद्याशाखेची परीक्षा सुरू होणार होती; परंतु प्रशासकीय कारणास्तव यात बदल करण्यात आला आहे. प्रवेश नियामक प्राधिकरणाकडून ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाला प्राप्त पत्रानुसार उशिरा प्रवेशित झालेले काही विद्यार्थी या परीक्षेला पात्र नसल्याचे कळविण्यात आले होते. त्यामुळे प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या मान्यतेअभावी परीक्षेला बसू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेविषयी पेच निर्माण झाला होता. पहिल्या दिवसाच्या पेपरसाठी १५६ विद्यार्थी अपात्र ठरून परीक्षेपासून वंचित राहणार असल्याने ही परीक्षा तत्काळ रद्द करण्यात आली. यासंदर्भात बुधवारी (दि. १३) प्रवेश नियामक प्राधिकरणाची मुंबई येथे बैठक होणार असून, या बैठकीत विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी निर्णय झाल्यानंतर सर्वच विद्याशाखांच्या परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होऊ शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, याविषयी परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध करण्यात आली असून, संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता व प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांना सूचित करण्यासंदर्भातही विद्यापीठाकडून सूचना करण्यात आल्या आहेत.