शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (08:46 IST)

कोरोना : दिवाळीनंतर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करणं शक्य आहे का?

मयांक भागवत
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. 17 ऑक्टोबर रोजी राज्यात 1715 नवीन रुग्ण सापडले, तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला.
 
सध्या राज्यातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचं प्रमाण) 97.39 टक्के आहे. तर मृत्यूचं प्रमाण 2.12 टक्के आहे.राज्यातील कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता सरकारनं हळूहळू निर्बंध कमी करायला सुरुवात केली आहे.राज्यातल्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तर येत्या 20 ऑक्टोबर म्हणजेच परवापासून राज्यातील सर्व महाविद्यालयं सुरू होणार आहेत.

7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली करण्यात आली आहेत. तर राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरनंतर सुरू होणार आहेत. अर्थात हे सगळं खुली करताना सरकारनं नियमावली जारी केली आहे.याशिवाय कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना राज्यात प्रवेश करण्यास मुभा देण्यात आली आहे.
 
टास्क फोर्सची बैठक
मुंबईत रविवारी (17 ऑक्टोबर) कोरोना संसर्गामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. कोव्हिड-19 चा संसर्ग पसरल्यानंतर तब्बल दीड वर्षांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूसंख्या शून्यावर आली आहे.यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (18 ऑक्टोबर) कोव्हिड टास्क फोर्सबरोबर बैठक केली.
 
या बैठकीत काही ठोस निर्णय घेण्यात आले. यामध्ये राज्यातील उपाहारगृहे, दुकाने यांच्या वेळा वाढवणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. याआधी 10 वाजेपर्यंत ही वेळ मर्यादित होती आणि पार्सल सेवा सुरू होती.
 
याशिवाय 22 ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क देखील सुरू होतील, असाही निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे मग दिवाळीनंतर महाराष्ट्र निर्बंधमुक्त होणार, असे संकेत राज्य सरकारनं यातून दिले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
गणेशोत्सव, दसरा या कालावधीतही रुग्णसंख्येत प्रचंड वाढ न झाल्यानं सरकार दिवाळीनंतर महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त करणार का, असंही विचारलं जात आहे.
 
बॅाम्बे हॅास्पिटलचे जनरल फिजीशिअन डॉ. गौतम भन्साळी यांच्या मते, "राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. हीच परिस्थिती पुढील काही दिवस कायम राहिली आणि सर्वांचं लसीकरण झालं, तर निर्बंध उठवण्यात काहीच हरकत नाही."
 
ते पुढे सांगतात, "सद्यस्थितीत आपण अनेक गोष्टी सुरू करण्याची मुभा दिलीये. पण दिवाळीपर्यंत आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात असेल तर निर्बंध पूर्ण उघडले पाहिजेत. सद्यस्थितीत आपल्याकडे जे रुग्ण येत आहेत हीच तिसरी लाट म्हणावी लागेल. आणखी कोणती नवीन लाट येण्याची शक्यता वाटत नाही."
 
चिंतेचं कारण काय?
राज्यातील बहुसंख्य भागातील रुग्णसंख्या खालावत असली, तरी सगळीकडे अशीच परिस्थिती आहे, असं म्हणता येणार नाही. ज्यातील काही शहरांमध्ये अद्यापही दररोज 50हून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.राज्यातील कोरोना रुग्णांची 17 ऑक्टोबर रोजीची जिल्हानिहाय आकडेवारी बघितल्यास यामध्ये मुंबई (366), ठाणे (57), नवी मुंबई (53), अहमदनगर (202), पुणे (237), सोलापूर (56) आणि सातारा (69) या शहरांचा समावेश आहे.त्यामुळे महिन्याभराच्या कालावधीत महाराष्ट्र कोरोना निर्बंधमुक्त होणार का, असाही प्रश्न आहे.
 
याविषयी मुंबईचे जनरल सर्जन डॉ. शिवकुमार उत्तुरे सांगतात, "आपण 2022 पर्यंत तरी पूर्णतः निर्बंधमुक्त होऊ शकणार नाही. याचं कारण मुंबईत रुग्णसंख्या अजूनही 500 च्या घरात आहे. आपण कोरोनापासून मुक्त झालेलो नाही. त्यामुळे मास्क, सोशल डिस्टन्सिंग सुरू ठेवावं लागेल."
 
ते पुढे सांगतात, "कोरोनावर अजूनही ठोस उपचार नाही. त्यामुळे सहव्याधी असलेल्यांनी काळजी घ्यायला हवी. 2022 पर्यंत सर्वांचं लसीकरण झालं तर आपण निर्बंधमुक्त करण्याचा विचार करू शकतो."

तर मुंबईच्या शिवडी टीबी रूग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॅा. ललित आनंदे सांगतात, "मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. मृत्यूदर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे दिवाळीनंतर निर्बंध कमी करण्यास हरकत नाही. दिवाळीनंतर आपण सामान्य जीवन नक्कीच जगू शकतो. पण त्यासाठी लोकांनीही काळजी घेतली पाहिजे. मास्क, सोशल डिस्टंसिंग पाळलं पाहिजे"मुख्यमंत्र्यांनी 18 ऑक्टोबरच्या कोव्हिड टास्क फोर्ससोबतच्या बेठकीत मुलांच्या लसीकरणासंदर्भात सूचना केली.
 
केंद्र सरकारच्या संपर्कात राहून लस उपलब्ध करून घेणे आणि याबाबतीत निर्णय झाल्यावर लसीकरणाची तयारी ठेवण्याचे नियोजन करणे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाला त्यांनी दिल्या आहेत.
 
लहान मुलांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावर डॉ. शिवकुमार उत्तुरे सांगतात, "18 वर्षांखालील मुलांना अजूनही लस उपलब्ध नाही. परदेशात शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना संसर्ग झाला आहे. ही मुलं सूपरस्रेडर ठरू शकतात. त्यामुळे आपण निर्बंध उघडतानाही काळजीपूर्वक निर्णय घेतला पाहिजे."
 
राज्यात कोरोनाची तिसरी लाट नाही?
आरोग्य विभागाने राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत गेल्या आठवड्यात कॅबिनेटला माहिती दिली होती. 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या कालावधीत मुंबईतील साप्ताहिक नवीन रुग्ण 18 ने वाढले होते. तर, इतर जिल्ह्यांत रुग्णसंख्या कमी होताना दिसून आली होती.
 
यावर महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक सांगतात, "सद्यस्थितीत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत नाहीये. पण, ऑक्सिजनच्या गरजेवर लक्ष ठेवलं पाहिजे. ऑक्सिजनची गरज वाढली तर निर्बंध पुन्हा घालावे लागतील."तज्ज्ञांच्या मते, कोरोना व्हायरसमध्ये मोठं म्युटेशन झालं नाही तर राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता जवळपास नाही.
 
मुंबईच्या लीलावती रुग्णालयाचे फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. जलिल पारकर म्हणतात, "कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णसंख्या वाढेल पण औषध, लसीकरण यामुळे रुग्णांची परिस्थिती गंभीर होणार नाही. कोरोना संसर्गाची लाट येणार नाही असं नाही. पण ही लाट फार जास्त वाईट नसेल."