शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 ऑक्टोबर 2021 (22:33 IST)

येत्या २२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क खुली होणार

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याने राज्य सरकारने कोरोना निर्बंध आणखी सैल करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार राज्यातील उपाहारगृहे, दुकानाची वेळ वाढवली जाणार आहे. मुंबईतील हॉटेल, बारच्या वेळा पूर्ववत करण्यात येणार आहे. याशिवाय २२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क खुली होणार आहेत.
 
अम्युझमेंट पार्कमधील मोकळ्या जागेत कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्याचे ठरले असून पार्क्समधील पाण्यातल्या राईड्सबाबतीत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी वर्षा येथे कोरोना कृती दलाच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत दिवाळीच्या तोंडावर कोरोना निर्बंध आणखी शिथिल करून जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने कोरोना निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्र्यांच्या बैठकीत दुकाने आणि उफारगृहांची वेळ वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली होती. सध्या दुकाने आणि उपहाररगृहे रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा आहे. ही वेळ आणखी वाढविण्यात येणार आहे.
 
आपण हळूहळू निर्बंध शिथिल करीत असून रुग्ण संख्या कमी होताना दिसते. २२ ऑक्टोबरपासून आपण चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करीत आहोत. उपाहारगृहे आणि दुकाने यांची वेळा वाढवून देण्याची सातत्याने मागणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.