रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 जुलै 2019 (16:14 IST)

मुलीच्या डोळ्यातून खडे पहायला लोकांची गर्दी, हा तर मानसिक आजार - डॉक्टर

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील  या इयत्ता चौथीत शिकणार्‍या मुलीच्या डोळ्यातून गेल्या दोन दिवसांपासून चणाडाळीच्या आकाराचे २० ते २२ खडे पडले आहेत. या घटनेबाबत परिसरात आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून, हा चमत्कार की वैज्ञानिक कारण याबाबत नागरिकांत कुतूहलही व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सुप्रसिद्ध नेत्र रोग तज्ञ डॉ. लहाने यांनी सर्व गोष्टी चुकीच्या असून त्या कोणतीतरी खोडसाळपणे करत आहे. सोबतच मुलीला मानसिक काही त्रास असू शकतो किंवा तिचे मित्र मैत्रीण, नातेवाईक तिच्या डोळ्यात अश्या प्रकारे काही टाकत असतील. डोळ्यात असे खडे तयार होऊच शकत नाही. या मुलीचे योग्य उपचार करत अश्या खोडसाळ गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे स्पष्ट मत डॉ. लहाने यांनी व्यक्त केले आहे.
 
मुलीच्या डोळ्यांतून पडणार्‍या खड्यांची चर्चा गावात पसरताच गावातील महिलांनी मुली भोवती गर्दी केली आहे. हा प्रकार म्हणजे चमत्कार की डोळ्यांचा आजार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ही बाब लक्षात घेता वडिलांनी चाळीसगाव येथे तिला डॉ. अमित महाजन (नेत्ररोगतज्ज्ञ) यांच्याकडे नेले. डॉ. महाजन यांनी मुलीच्या उजव्या डोळ्याची तपासणी करून डोळ्याचा फोटो काढला.मुलीच्या डोळ्यात इन्फेक्शन झाल्याचा दावा डॉ. महाजन यांनी केला आहे. त्यानुसार डोळ्याचा ड्रॉपही त्यांनी दिला. पिलखोड गावातील डॉ. चंद्रकांत पाटील यांनीही मुलीच्या डोळ्याची तपासणी केली असता तिला १० ते १५ मिनिटे बसविले असता तिच्या डोळ्यांत दहा मिनिटांच्या अंतराने वेदना होत असल्याचे निदर्शनास आले. तिचा डोळा दाबला असता डोळ्यातून खडा बाहेर पडला, असे तिचे वडील सांगत आहेत. त्यांच्या शेजारी राहणारे मुन्ना गोसावी यांच्या घरी ती मुलगी खेळत असताना तिच्या डोळ्यातून खडे पडत असल्याचे गोसावी यांनी तिच्या आईवडिलांना सांगितले.मात्र त्यावर त्यांचा विश्‍वास बसत नव्हता.
 
बुधवारी (दि. 3) पुन्हा तिच्या डोळ्यातून चार ते पाच खडे पडले. ही बाब लक्षात घेता या दाम्पत्याने श्रद्धाला चाळीसगाव येथील तपासण्यासाठी नेले असता पुन्हा तेथेही खडे पडले. घाबरण्यासारखे कारण नसल्याचे डॉक्टर सांगत असले, तरी मग डोळ्यातून खडे येतात कसे असा प्रश्‍न गावकरी उपस्थित करीत आहेत. संपूर्ण गावात हा प्रकार म्हणजे  चमत्कार आहे कि काय, अशी चर्चा करण्यात येत आहे.