रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (08:07 IST)

नाशिक मध्ये बँकेत धाडसी चोरी; 17 लाख रुपये नेले चोरून

नाशिक : शहरात एक चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. पंचवटी परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेठ रोड येथील शाखेतून कॅशिअरजवळून चाेरट्याने 17 लाख रुपये अलगद चाेरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार बँकेत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 
बँकेत कर्मचारी असताना त्यांच्या डोळ्यादेखत रक्कम गायब झाल्याने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या चोरीच्या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा रंगली असून एकच खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पंचवटीत असलेल्या पेठ रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून कॅशियर जवळ ठेवलेल्या नोटांच्या बंडल मधून चाेरट्याने 17 लाख रुपये चाेरुन नेले.
 
हिशेब लागत नसल्याने सदर बँकेतील सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्यात एक चाेरटा पैसे घेऊन पळून जाताना दिसत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ग्राहक बनून आलेल्या भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात गुंग असल्याची संधी साधून ही चाेरी केली आहे. विशेष म्हणजे बँक व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे ही राेकड लंपास झाल्याचा आराेप आता होऊ लागला आहे.
 
पंचवटी पाेलिसांनी सीसीटीव्ही फूटेजनुसार चाेरट्याचा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.त्यामुळे आता पोलिसांसमोर देखील बँकेतून रोकड लंपास केलेल्या भामट्याला शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor