शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक हेक्टरवरील नुकसानावर कर्ज माफ-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. नुकसानग्रस्त पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी नुकसानभरपाई देऊ केली आहे. कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती, तिथलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं आहे. नुकसानग्रस्तांसाठी एक उपसमिती तयार करण्यात आली आणि त्या समितीला सर्व अधिकार देण्यात आले होते. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना १ हेक्टरवरील नुकसानावरचं कर्ज माफ केलं जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. पुरामध्ये ज्यांची घरं कोसळली आहेत त्यांनाही सरकार मदत करणार आहे. सांगली आणि कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांना सरकराने मोठा दिलासा दिला आहे.
 
एक हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांनी जे काही पिक घेतलं असेल, त्यासाठी जे नियमाने कर्ज मिळतं तेवढं कर्ज आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने ऊस लावला असेल तर त्याला जे जास्तीत जास्त कर्ज मिळतं ते माफ केलं जाणार आहे. ज्यांनी कर्ज घेतलं नाही आणि तरीही त्यांच्या पिकाचं नुकसान झालं आहे अशा शेतकऱ्यांना सरकारच्या नियमाप्रमाणे जी नुकसान भरपाई दिली जाते त्याच्या तिप्पट भरपाई राज्य सरकारतर्फे दिली जाणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. तसेच पंतप्रधान आवास योजनेतून मिळणारे दोन लाख आणि त्याच्यावर 1 लाख रुपये अतिरिक्त राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणार आहेत. तसेच घर बांधण्याकरिता ५ ब्रास वाळू आणि ५ ब्रास मुरुम मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचाही उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
 
कोसळलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शिवाय ज्यांची घरं कोसळलेली आहेत त्यांना एक लाखाची अतिरिक्त मदतही केली जाणार आहे. पाच ब्रास वाळू आणि मुरुमही दिला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ज्या छोट्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना ५० हजारांपर्यंत मदत दिली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. रोगराई, महामारी पसरु नये यासाठी तातडीची पावलं उचलली जात आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. जनावरांच्या गोठ्यासाठीही अर्थसहाय्य करण्याचं ठरवलं असून, त्यासाठी १ लाख रुपये मदतनिधी देण्यात येणार आहे. विशेषतः पुराच्या काळात दुसरीकडे राहणाऱ्या ग्रामीण भागासाठी २४ हजार घरभाडे देणार आहोत, तर शहरी भागासाठी ३६ हजार देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.