शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 जून 2022 (11:30 IST)

दीपक केसरकर, आशिष जैस्वाल शिंदेंच्या गटात दाखल

eknath shinde
महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आणखी 4 आमदार रात्रीतून गुवाहाटीला पोहोचले होते तर आज सकाळी आणखी 4 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत.
 
दीपक केसरकर, आशिष जैस्वाल, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे चार आमदार सकाळीच गुवाहाटीमध्ये आले आहेत. ते आज एकनाथ शिंदे गटात दाखल झाले आहेत.
 
सामनातून बंडखोरांचे कान टोचले
4 आमदार रात्रीतून गुवाहाटीला पोहोचले होते बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातल्यानंतर मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गर्दी जमली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने बंडखोर आमदारांचे कान टोचले असून त्यांना वेळीच शहाणे होण्याचा इशारा दिला आहे.
 
जर शिवसेनेनी ठरवलं तर या सर्व आमदारांना माजी केले जाईल असं या अग्रलेखात म्हटले आहे. ही सर्व खेळी भाजपची आहे हे न ओळखण्याइतकी महाराष्ट्रातील जनता वेडी नाही.
 
शिवसेनेनी अनेक जय-पराजय पाहिले आहेत. तेव्हा शिवसेनेचे काही नुकसान होणार नाही पण भाजपचे ऐकून या बंडात सामील होणाऱ्या आमदारांचे नुकसान होऊ शकते तेव्हा त्यांनी वेळीच शहाणे होण्याची गरज आहे असं या अग्रलेखात म्हटलं आहे.
 
मुख्यमंत्री मातोश्रीवर
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी 'वर्षा' हे शासकीय निवासस्थान सोडून 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी पोहोचले आहेत. पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे हेही उद्धव ठाकरेंसोबत होते.
 
'वर्षा' बंगल्यावरून 'मातोश्री'पर्यंत येईपर्यंत रस्त्यात शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी उद्धव ठाकरेंवर पुष्पवृष्टी केली गेली, घोषणा दिल्या गेल्या.
 
उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि एकनाथ शिंदेंच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या.
 
उद्धव ठाकरेंनी संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी थेट संवाद साधला. या भाषणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा शासकीय बंगला वर्षा सोडण्याची तयारी केली आणि थोड्या वेळात तिथून निघाले.
 
वर्षा हे मुख्यमंत्र्याचं अधिकृत निवासस्थान आहे. या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी फारसं वास्तव्य केलं नाही. ते मुख्यमंत्री झाल्यापासून मातोश्री हेच सत्ताकेंद्र राहिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी वर्षा सोडण्याची तयारी दाखवल्यामुळे पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
 
आणखी चार आमदार गुवाहाटीला पोहोचले
गुलाबराव पाटील, योगेश कदम, चंद्रकांत पाटील आणि मंजुळा गावित हे चार आमदार बुधवारी रात्री गुवाहाटीला पोहोचले आहेत. त्यापैकी जळगावचे चंद्रकांत पाटील हे अपक्ष आमदार आहेत. आणि ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.
 
तर योगेश कदम हे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या बंडाला रामदास कदमांची साथ असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
तर गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
 
हे सर्व आमदार आता सर्व गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलात पोहोचले आहेत.
 
'सत्याचा विजय होईल'
 
आम्ही लढणारे लोक, शेवटी सत्याचा विजय होईल, आम्हाला सत्तेचा मोह नाही, मुख्यमंत्री वर्षा सोडून मातोश्रीवर निघाले आहेत, असं संजय राऊत म्हणाले. शरद पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्याचं ते म्हणाले. अविश्वास ठराव मांडल्यास बहुमत सिद्ध करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.