शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (14:57 IST)

मनोज जरांगेंची वंशावळ वगळण्याची मागणी; पण वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढतात?

manoj jarange
-श्रीकांत बंगाळे
वंशावळीच्या दस्ताऐवजाशिवाय मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.
 
मराठा समाजातील ज्या व्यक्तींची कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल, त्यांना कुणबी जातीचे दाखले दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (6 सप्टेंबर) केली होती.
 
त्यावर आज (7 सप्टेंबर) उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
 
जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. पण, ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असा सरकारच्या निर्णयात उल्लेख आहे. पण, आमच्याकडे कुणाकडच वंशावळीचे दस्ताऐवज नाहीयेत. त्यामुळे आम्हाला त्याचा 1 टक्काही फायदा होणार नाही.”
 
“त्यामुळे या निर्णयात थोडी सुधारणा करा अशी आमची मागणी आहे. ज्यांच्याकडे वंशावळीच्या नोंदी असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र दिलं जाईल, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. त्यात थोडी सुधारणा करुन वंशावळीचा उल्लेख वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळेल, अशी सुधारणा करा. फक्त वंशावळ शब्दात सुधारणा करा, मराठा समाज तुमचं स्वागत करेल,” असं जरांगे पुढे म्हणाले.
 
पण, वंशावळ म्हणजे काय? ती कशी काढतात? तिचे फायदे काय आहेत, जाणून घेऊया.
 
वंशावळ म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास वंशावळ म्हणजे आपल्या पूर्वजांचा इतिहास. आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती वंशावळीत नमूद केलेली असते.
 
आपल्या पिढीच्या पहिल्या व्यक्तीपासून तर आता अस्तित्वात असलेल्या व्यक्तीपर्यंतच्या प्रत्येक व्यक्तीचं नाव क्रमवार उतरत्या स्वरूपात लिहिलेल्या कागदपत्राला वंशावळ म्हणतात.
 
आपल्या पिढीत आपण ही नावं खापर पणजोबा किंवा आजोबापासून लिहू शकतो.
 
यालाच इंग्रजीत फॅमिली ट्री असं संबोधलं जातं.
 
वंशावळ कशी काढतात?
वंशावळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील आधीच्या पिढीतल्या व्यक्तींची नाव उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.
 
आधी खापर पणजोबा, मग पणजोबा, त्यानंतर आजोबा, आजोबाची मुलं, आजोबांच्या मुलांची मुलं अशी नावं उतरत्या क्रमानं लिहावी लागतात.
 
ज्या व्यक्तीचा जातीचा दाखला काढायचा आहे, त्याच्या नावापर्यंत ही वंशावळ लिहावी लागते.
 
समजा मला कुणबी प्रमाणपत्र काढायचं आहे, तर मी शोध घेणार की, माझ्या पणजोबाच्या नावासमोर कुणबी आहे.
 
याचा रेकॉर्ड तहसील कार्यालयात जुने हक्क नोंदण्यांमध्ये आढळतो. कोतवाल बुकामध्ये जन्म-मृत्यूची नोंदवही असते. तिथं कुटुंबाच्या पूर्वजाचा इतिहास मिळतो.
 
याशिवाय, जुन्या शैक्षणिक नोंदींमध्येही पूर्वजांच्या जातीचा उल्लेख आढळतो. आजोबा शिकलेले असेल आणि त्यांनी जातीची नोंद केलेली असेल तर तिथंही नोंद आढळते.
 
वंशावळ कशासाठी लागते?
आताच्या जन्म नोंदींसमोर नावासमोर जात लिहिली जात नाही. फक्त आडनाव लिहिलं जातं.
 
पण कॉलेजमधील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जातीचं प्रमाणपत्र काढावं लागतं. त्यासाठी जुन्या रेकॉर्डचा आधार घ्यावा लागतो. कारण जुन्या रेकॉर्डमध्ये नावासमोर जातीचाच उललेख केलेला असायचा.
 
याशिवाय, जात पडताळणीसाठीही वंशावळ लागते.
 
वंशावळ काढण्याची जबाबदारी कुणाची?
वंशावळ काढण्याची जबाबदारी ही अर्जदाराची स्वत:ची असते.
 
वंशावळ स्वयंघोषित असते. म्हणजे अर्जदारानं स्वत:हून वंशावळ लिहायची असते.
 
वंशावळीसाठी कुठेही अर्ज वगैरे करायची गरज नसते.
 
एखाद्याची कुणबी नोंद सापडल्यास इतरांना फायदा?
एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींपैकी कुणाचं कुणबी नोंद आढळल्यास त्याच्या पुढच्या पिढ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतं.
 
याचा अर्थ एखाद्या भागात एकाची कुणबी नोंद सापडली म्हणजे त्या भागातल्या सगळ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा होत नाही.
 
यासाठी प्रत्येकाला स्वतंत्रपणे कुटुंबाचा इतिहास तपासून त्यासंबंधीची कागदपत्रं सबमिट करावे लागतील.