1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (09:46 IST)

अंतर्गत सुरक्षेकरीता अधिकचे पोलीस बळ उपलब्धतेसाठी विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित - मुख्यमंत्री

देशाच्या सीमेवर असणारी स्थिती लक्षात घेवून अंतर्गत सुरक्षा अबाधीत राखण्यासाठी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुरक्षेकरिता तैनात असलेले सहा हजार पोलीस मुंबईसह राज्यातील अन्य भागात उपलब्ध करुन देण्‍याकरिता अर्थसंकल्पीय अधिवेशन संस्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घाबरुन जाण्याची स्थिती नसून अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केले.
 
दोन्ही सभागृहांचे आभार मानत मुख्यमंत्र्यांनी अधिवेशन संस्थगित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, जम्मू काश्मिर मधील पुलवामा येथे भारतीय जवानांवर निर्घृण हल्ला झाला. त्यानंतर भारतीय वायू सेनेने सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवादी संघटनांचे अड्डे नष्ट केले. काल देखील सीमेवर घटना घडल्या. ही तणावाची स्थिती लक्षात घेता त्याला उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदल सक्षम आहे. अंतर्गत सुरक्षा देखील अबाधित राखणे महत्वाचे आहे. आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहरासोबतच अन्य शहरांमध्ये नेहमीपेक्षा जास्त निगराणी असावी. ही पोलीस विभागाची भावना आहे. घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र काळजी घेणे गरजेचे आहे.
 
राज्यात सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी सहा हजार पोलीस तैनात आहेत. या भागात काही महत्वपूर्ण इमारतीदेखील आहेत. राज्यात सुरक्षेसाठी अधिकचा पोलीस फोर्स मिळाला तर अधिकची काळजी घेता येईल. यासंदर्भात काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यात पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त यांनी राज्यातील परिस्थ‍ितीची माहिती दिली. आम्ही योग्य तो विचार केला. आज सकाळी बैठक घेतली आणि त्यात एकमताने अधिवेशन संस्थगित करण्याबाबत निर्णय घेतला. अधिवेशन आटोपून जो पोलीस फोर्स उपलब्ध होणार आहे. तो मुंबई व उर्वरित महाराष्ट्रात उपलब्ध करुन देण्यात येईल. विरोधी पक्षांनी देखील याला सहमती दिली.