मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (15:24 IST)

दिलीप वळसे पाटील यांनी असे केले आहे आवाहन

हिजाब प्रकरणावरून आंदोलन होण्याची परिस्थिती पाहाता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महाराष्ट्रातील नागरिक आणि राजकीय पक्षांना देखील तंबी दिली आहे. “परराज्यातल्या एखाद्या मुद्द्यावर आपल्या राज्यातली शांतता बिघडवू नका”, असं आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केलं. “जातीजातीमध्ये किंवा धर्माधर्मामध्ये आपण अनावश्यक संघर्ष करायला लागलो, तर समाजात एक दुही तयार होते. त्यामुळे हे आंदोलन शक्यतो करू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी शांतता पाळण्यासाठी सहकार्य करावं”, असं वळसे पाटील म्हणाले.
 
दरम्यान, यावेळी बोलताना गृहमंत्र्यांनी सामान्य नागरिकांसोबतच या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांना देखील तंबी दिली. “जे मी सामान्य नागरिकांना सांगितलं तेच राजकीय पक्षांनाही सांगतो आहे. त्यांनी विनाकारण राज्यात या विषयावरून अस्वस्थता निर्माण करू नये आणि पोलीस विभागाचं काम वाढवू नये”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.
 
“माझी धर्मगुरूंना प्रार्थना राहील की आवाहन करताना आपण कुणालाही प्रक्षुब्ध करणारं किंवा रोष वाढवणारं वक्तव्य करू नये. तुमचे जे हक्क आहेत ते आहेतच. पण विनाकारण या गोष्टीचं भांडवल करू नये”, असं वळसे पाटील म्हणाले.