शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 एप्रिल 2023 (21:30 IST)

रामनवमी उत्सवामुळे स्वराज्य संघटनेने आंदोलन घेतले मागे

sayogita
नाशिक : नाशिकच्या काळाराम मंदिरबाबत संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली.  संयोगिताराजे छत्रपती यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तीच्या विरोधात केली आहे. त्यात कोणतीही चूक नाही, मात्र या संदर्भातील स्वराज्य संघटनेचे आंदोलन मागे घेत असून सध्या रामनवमी उत्सव सुरू असल्याने हा निर्णय घेतल्याचे स्वराज संघटनेचे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितले. त्याचबरोबर इतरांनी देखील आंदोलन करू नये, असे आवाहन स्वराज्य संघटनेकडून करण्यात आले आहे.
 
दरम्यान याबाबत  स्वराज्य संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात होती, स्वराज्य संघटनेकडून संयोगिताराजे छत्रपती यांची पोस्ट अत्यंत सत्य आणि वस्तुनिष्ठ आहे. या प्रकरणी आंदोलन करण्याचे ठरविले होते, मात्र रामनवमीमुळे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेत आंदोलन रद्द करत असल्याचे स्वराज्य संघटनेकडून सांगण्यात आले.
 
यावेळी प्रवक्ते करण गायकर म्हणाले की, सध्या रामनवमी उत्सव सुरू असल्याने आंदोलन मागे घेत आहे. त्याचबरोबर रामनवमी उत्सव सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. आमच्या आंदोलनामुळे कुणालाही त्रास होऊ नये यासाठी आंदोलन मागे घेत आहे. मात्र संबंधित महंतांनी माफी मागावी ही आमची मागणी आहे.
 
यावेळी करण गायकर यांनी संघटनेची भूमिका मांडताना म्हणाले की, संयोगिताराजे छत्रपती या रामनवमीच्या दिवशी व्यक्त झाल्या. त्या व्यवस्थेच्या विरोधात व्यक्त झाल्या. त्यांनी पोस्टमध्ये सांगितलेली गोष्ट अत्यंत खरी असून मात्र महंत सांगतात की असं नव्हतं. “मात्र ते खोटे बोलत असून पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पोस्ट वाचलेली नाही, मग कोणत्या आधारावर ते बोलत आहेत,” असा प्रश्नही स्वराज्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
 
शिवाय महंतांना अशी अवाजवी वक्तव्ये करून प्रकाश झोतात राहण्याची सवय असल्याचा आरोप देखील संघटनेकडून करण्यात आला. तर अशा महंतांना सद्बुद्धी यावी यासाठी पोस्ट केली असून हा अपप्रवृत्तीचा लढा होता, या प्रकरणावर माफी मागणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. पुजाऱ्याने खोटं बोलू नये, त्यांना त्यांच्या कृतीची जाणीव होणे आवश्यक आहे. दरम्यान याप्रकरणी मंदिर पुजाऱ्याने दिलगिरी व्यक्त न करता माफी मागावी अशी अपेक्षा आहे, सत्य परिस्थिती सांगावी अशी मागणी स्वराज्य संघटनेकडून करण्यात आली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor