शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 6 मे 2017 (11:27 IST)

आता विज बील भरा ऑनलाईन ‘आपले सरकार’च्या माध्यमातून

महावितरणच्या विविध सेवा ऑनलाईन उपलब्ध झाल्या असून ‘आपले सरकार’च्या महाऑनलाईनवरून वीजबिल भरणा करण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 355 महाऑनलाईन केंद्रे व ‘वक्रांगी’च्या 382 केंद्रांवर ग्राहकांना त्यांचे वीजबिल भरता येणार आहे.

अधिकाधिक ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले आहे.
महावितरणने अधिकृत ऑनलाईन वीजबिल भरणा केंद्र म्हणून नाशिक जिल्ह्यात ‘आपले सरकार’च्या महाऑनलाईन व ‘वक्रांगी’ यांना मान्यता दिली आहे. वीजबिल भरणा हे ‘आपले सरकार’च्या महाऑनलाईनवरून मिळणार्‍या विविध सेवांचा एक भाग असेल. अधिकृत केंद्र ग्राहकांकडून स्वीकारलेली वीजबिलाची रक्कम महावितरणकडे ऑनलाईन जमा करतील. या केंद्रांकडून वीजबिलापोटी भरलेल्या रकमेची पावतीही ग्राहकांना देण्यात येईल.

‘आपले सरकार’चा ग्रामपंचायत स्तरापर्यंत विस्तार होत असून यातून ग्राहकांना नजीकच्या ठिकाणी वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परिणामी ग्राहकांचे कष्ट व वेळ वाचण्यास मदत होईल. अनधिकृत ऑनलाईन वीजबिल भरणा केंद्र ग्राहकांकडून जमा करून घेतलेल्या रकमेचा भरणा महावितरणकडे करत नसल्याचे निदर्शनास आले असून यातून ग्राहक व महावितरणलाही नाहक त्रास सहन करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर ऑनलाईन वीजबिल भरणा केंद्र म्हणून ‘आपले सरकार’च्या महाऑनलाईन व ‘वक्रांगी’ यांना महावितरणने अधिकृत केले आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या महाऑनलाईनचे 355 व ‘वक्रांगी’चे 382 केंद्रे असून या केंद्रांवर ग्राहकांना वीजबिल भरता येईल. या सेवेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन मुख्य अभियंता कुमठेकर यांनी केले आहे.