सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 20 जानेवारी 2021 (22:29 IST)

अखेर नाव बदलले, यापुढे ‘साबळे बिडी’ नावाने बिडीची विक्री

साबळे वाघिरे कंपनीने चार महिन्यांपूर्वी संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता.  या मागणीसाठी अनेक वर्षांपासून संभाजी ब्रिगेड, अनेक शिवप्रेमी संघटना आणि काही राजकीय संघटना प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ही मागणी घेऊन आंदोलनही करण्यात आले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे. 
 
साबळे वाघिरे आणि कंपनीने संभाजी बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु नाव बदलण्यास थोडा वेळ लागेल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. आता कंपनीने बिडीचे नाव बदलले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विकली जाणारी बिडी आता ‘साबळे बिडी’ या नावाने विकली जाणार आहे. संभाजी ब्रिगेड, शिवधर्म फाऊंडेशन, इतर शिवप्रेमी संघटना आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनभावनेचा आदर करुन आम्ही बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे साबळे वाघिरे आणि कंपनीचे संचालक संजय वाघिरे यांनी पत्रकाद्वारे जाहीर केले.