गुरूवार, 9 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:28 IST)

नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष निर्यात घटली

Grapes of Nashik district  Exports of grapes decreased due to natural calamities
जगातील २५ ते ३० देशांमध्ये महाराष्ट्रातील द्राक्ष निर्यात होत असतात. यंदाही द्राक्ष निर्यात होत आहे. मात्र, नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा निम्म्याहून अधिक निर्यात ही घटली. २०२१-२२ मध्ये मार्चअखेरपर्यंत १ लाख ५ हजार ८२७ मेट्रिक टन द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा ती अवघी ४१ हजार १०८ मेट्रिक टन झाली. देशांतर्गत द्राक्षांना मागणी वाढली हीच फक्त द्राक्ष उत्पादकासाठी जमेची बाजू आहे.
 
नाशिक जिल्ह्यातील द्राक्षे युरोप, आखाती देशासह श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. परंतु, यंदा द्राक्ष काढणीच्या हंगामाच्या सुरुवातीपासूनच द्राक्षांवर नैसर्गिक संकटे आली. यात सुरुवातीला थंडी असल्याने द्राक्षांमध्ये साखर उतरण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर अवकाळी पावसाने द्राक्षांचे नुकसान झाले. परदेशातही द्राक्षांतील गोडवा (१७ ते १८ ब्रीक्स साखर) हवा अशी मागणी होऊ लागल्याने अनेक द्राक्ष उत्पादकांचे नमुने बाद ठरवण्यात आले. त्याचाही फटका निर्यातीवर झाला आहे.
 
नेदरलँडला सर्वाधिक मागणी आहे. याशिवाय इंग्लंड, जर्मनी, लॅटविया, लुथियाना, डेन्मार्क, स्वीडन, आयर्लंड, पोलंड, पोर्तुगाल, बेल्जिअम, स्वित्झर्लंड, रोमानिया, आॅस्ट्रिया, फिनलंड, स्पेन, इटली, ग्रीस या देशांमध्ये द्राक्षे निर्यात केली. युरोपातील नेदरलँड या देशात सर्वाधिक म्हणजे ३० हजार ५८७ मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली. त्याखालोखाल इंग्लड, जर्मनी या देशामध्ये द्राक्षांना मागणी आहे. महाराष्ट्र मोठा पुरवठादार आहे.
 
सध्या निर्यातक्षम द्राक्षांना प्रतिकिलो ६० ते ७० रुपये, तर देशांतर्गतसाठी २३ ते २७ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. परंतु, स्थानिक पातळीवरच द्राक्षांची मागणी वाढल्याने दर स्थिर राहिले आहे. आता पुन्हा उन्हाची तीव्रता वाढणार असल्याने द्राक्षामध्ये गोडवा अधिक वाढत अाहे. गोड द्राक्षांना स्थानिक ग्राहक पसंती देत असल्याने मागणी वाढणार आहे. त्यामुळे द्राक्षांचे दरदेखील वाढण्याची शक्यता आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor