गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (21:25 IST)

खळबळजनक : औरंगाबादच्या वैजापूरात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात

Fake notes of one hundred and five hundred मागील काही दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची चर्चा पाहायला मिळत असताना, प्रत्यक्षात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये आणि सोलापूरच्या बार्शीत देखील बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. वैजापूर शहरात अज्ञात भामट्याने 500 रुपयांच्या पाच बनावट नोटा देऊन तीन विक्रेत्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघांना बीडच्या परळीमधून ताब्यात घेण्यात आले आहे. पाचशे रुपयांची हुबेहूब दिसणारी चलनी नोट निरखून बघितल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात येते, मात्र तोपर्यंत बनावट नोट लक्षात येत नाही. दरम्यान वैजापूर शहरातील जुने बसस्थानक परिसरात असलेल्या काही विक्रेत्यांना अशाच बनावट नोटा देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. त्या नोटा खोट्या असल्याचे समोर आल्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे नोटांची खात्री करूनच व्यवहार करावा, असे आवाहन स्थानिक पोलिसांनी केले आहे.
 
सोलापूरच्या बार्शी शहरातील एका व्यापाऱ्यास बोगस नोटा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दरम्यान याची माहिती बार्शी शहर पोलिसांना लागताच त्यांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे 100 रुपयांच्या 20 बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी सुनील चंद्रसेन कोथींबिरे (वय 23 , रा. पिंपळगाव नकले, ता. माजलगाव ह. मु. माळीनगर अंबाजोगाई) व आदित्य धनंजय सातभाई (रा. तडोळी, ता. परळी, ह.मु.स्टेशन लाईन गांधी मार्केट परळी) या दोघांना ताब्यात घेऊन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले होते.
 
दरम्यान या प्रकरणात बीड कनेक्शन समोर आल्यावर अंबाजोगाई व परळीला येथे बार्शी पोलिसांचे एक पथक आले होते. बीड जिल्ह्यात आलेल्या बार्शी पोलिसांनी गुरुवारी पहाटेच खदील जमाल शेख (रा. मिरवट, ता. परळी) व विजय सुधाकर वाघमारे (रा. गांधी मार्केट, परळी) या दोघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक कार, 50 व 100 रुपयांच्या 10 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटाही जप्त केल्या आहेत.