शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 एप्रिल 2023 (09:18 IST)

Nashik बापानेच केला अल्पवयीन मुलीचा खून; नाशिक जिल्ह्यातील घटना

Nashik News नात्याला काळिमा फासणारी घटना सटाणा तालुक्यात घडली. जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी, की लखमापूर शिवारातील एका उच्चवर्णीय शेतकर्‍याची मुलगी घरात काहीही न सांगता दोन वेळा निघून गेली होती. मुलगी अचानक निघून गेल्यामुळे समाजात अनेक तर्क-कुतर्क व्यक्त होऊन बदनामी झाली, अशी या शेतकर्‍याची भावना झाली.
 
यामुळे या संतप्त शेतकर्‍याने तरुण वयातील आपल्या मुलीचा गळा आवळून तिला जिवे ठार केले. गळा आवळल्यामुळे गळ्यावर पडलेले काळसर व्रण लवकर लक्षात येऊ नयेत, म्हणून या बापाने मुलीच्या गळ्यावर पॉण्ड्स पावडरचा मारा केला आणि विजेचा शॉक लागून मयत झाली असा देखावा केला.
 
बुधवारी झालेल्या या हत्या प्रकाराची सटाणा पोलिसांना खबर लागताच वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपीस भा. दं. वि. 302 व 201 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
 
या हत्येचे आणि अटकेचे वृत्त परिसरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. अधिक तपास सटाणा पोलीस करीत आहेत.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor