मंगळवार, 4 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (16:47 IST)

बळजबरीने धर्मांतराचे प्रकार; पाठपुरावा व कारवाई करणार - चित्रा वाघ

Chitra Wagh
नाशिक जिल्ह्यात  बळजबरीने धर्मांतर  करण्याचे प्रकार घडत असून  त्याची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी शासन पातळीवर  पाठपुरावा करावा लागेल, असे भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
 
चित्रा वाघ  या नाशिक दौर्‍यावर आल्या असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून सिन्नर येथील घटनेची माहिती दिली. गेल्या महिन्यात सिन्नर येथे एका महिलेचे बळजबरीने धर्मांतर करण्यासाठी तिला डांबून ठेवण्यात आले.त्यानंतर तिला बळजबरीने गोमांस  शिजविण्यास सांगून मुलांना जिवे मारण्याच्या धमक्या  देण्यात आल्या. यानंतर महिनाभर अत्याचार केल्याच्या महिलेने सांगितले होते.
 
ही  पीडित महिला मुळची संगमनेरची असून लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाली होती. तसेच लॉकडाऊन काळात पतीची नोकरी गेल्यामुळे कामधंद्याच्या शोधात ते सिन्नर तालुक्यात माळेगाव व मुसळगाव परिसरात आले. त्यावेळी एका महिलेने संबधित तरुणीला नोकरीच्या अमिषाने नेऊन धर्मांतरासाठी तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाले. तिच्या पतीने मित्रांच्या सहाय्याने तिला सोडविले. या काळात ग्रामीण पोलिस अधी़क्षक उमाजी उमाप  यांनी  सहकार्य केल्याने ती धर्मांतरापासून वाचली. मात्र असे प्रकार यापुर्वीही झाले असण्याची शक्यता आहे. म्हणून या गुन्ह्याची  पाळेमुळे शोधण्यासाठी आम्ही पोलिसांना साकडे घातले आहे, असे वाघ यांनी म्हटले आहे.
 
राज्यात  शिंदे फडणवीस सरकारच्या काळात या अशा अनिष्ट प्रवृत्ती ठेचल्या जातीलच, त्यासाठी आम्हीही कटिबद्ध आहोत. मात्र असे गैरप्रकार टाळण्यासाठी महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे व बळजबरीचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी कायदे आणखी कडक व त्याची अंमलबजावणी  व कठोर कारवाईसाठी साठी आम्ही आग्रही राहणार आहोत, असेही वाघ यांनी स्पष्ट केले. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे, संतोष नेरे आदींसह पिडित महिलेचे कुटुंबीय उपस्थित होते.
Edited by : Ratnadeep Ranshoor