वडाळा-पाथर्डी रोडवरील चार कॉफी शॉप्स उद्ध्वस्त, अंधाऱ्या खोल्यांत कापडी कंपार्टमेंट बनवून लावले होते पडदे
नाशिक कुठलाही परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून मुलामुलींना अश्लील कृत्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या चार कॉफी शॉप्सचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस शिपाई मुश्रीफ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की आरोपी अमोल लहू पिंगळे (वय 30, रा. उत्तमनगर, सिडको), अनिकेत सोमनाथ अहिरे (वय 21, रा. पंडितनगर, सिडको), विवेक प्रवीण सोनजे (वय 22, रा. साहिल अपार्टमेंट, उंटवाडी, नाशिक) व दिनेश प्रभाकर जावरे (वय 28, रा. आशीर्वाद अपार्टमेंट, उत्तमनगर) यांनी
ब्लॅकस्पून कॅफे (बापू बंगला), टोकियो कॅफे, ब्लॅकस्पून कॅफे व दक्ष इम्पिरिया यांनी वडाळा-पाथर्डी रोडवरील सराफनगर येथे कॉफी शॉप सुरू केले; मात्र कुठलाही परवाना नसताना चारही आरोपींनी कॉफी शॉपचा बोर्ड लावून आतमध्ये अंधाऱ्या खोल्यांत कापडी कंपार्टमेंट बनवून पडदे लावले व त्यात मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लील कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची तक्रार इंदिरानगर पोलिसांकडे दाखल होताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन चारही विनापरवाना कॉफी शॉप्सवर छापा टाकून कारवाई केली.
या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक परदेशी करीत आहेत.