शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 4 जून 2022 (21:55 IST)

गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले यांचे निधन

फोटो साभार -सोशल मीडिया गझलकार व साहित्यिक कमलाकर आत्माराम देसले (५९) यांचे मालेगाव येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.देसले यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 
 
देसले यांनी दीर्घकाळ झोडगे येथील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. देसले यांचे ‘ ज्ञानिया तुझे पायी’, ‘काळाचा जरासा घास’ हा गझलसंग्रह, कवी खलील मोमीन व कमलाकर देसले यांच्यात प्रदीर्घ काळ चाललेल्या कवितेतल्या पत्रव्यवहारावर आधारित ‘बिंब-प्रतिबिंब’, ‘काही श्वास विश्वासाठी' हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. विविध वृत्तपत्रे, मासिकांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए. (द्वितीय)अभ्यासक्रमात त्यांच्या पाच कवितांचा समावेश करण्यात आला होता तर पुणे विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. च्या अभ्यासक्रमात देखील तीन गझलांचा समावेश होता. काही ग्रंथांचे त्यांनी संपादन व अनुवादही केले होते. तर काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे.
 
देसले यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात सह्याद्री वाहिनी व रंगबावरी संस्था मुंबईचा महाकवी कालिदास राज्यस्तरीय पुरस्कार, धरणगावचा राज्यस्तरीय बालकवी पुरस्कार, उदगीरचा राज्यस्तरीय साहित्य प्रबोधन पुरस्कार, नांदगावचा राज्यस्तरीय समता काव्य पुरस्कार, राज्यस्तरीय स्मिता पाटील शब्दपेरा काव्य पुरस्कार, नाशिकच्या सावानाचा कवी गोविंद पुरस्कार, साहित्य सावाना पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, माउली साहित्य भूषण पुरस्कार, ज्ञानप्रबोधिनी पुण्याचा अध्यापकोत्तम पुरस्कार, कसमादे गौरव पुरस्कार आदी पुरस्कार ,मिळाले आहेत.