शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :बारामती , गुरूवार, 19 एप्रिल 2018 (11:53 IST)

मानट वस्तीत प्रथमच वीज आल्यानंतर आनंदाने उजळलेले मुलींचे चेहरे

भोर तालुक्यातील दुर्गम मानट वस्तीत प्रथमच वीज पोहोचल्याने रहिवाशांचा आनंद द्विगुणित झाला आहे. दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून महावितरणने या वस्तीतील 14 घरांना मंगळवारी वीजजोडणी दिली.
  
भोरपासून सुमारे 58 कि.मी. अंतरावर वरंधा घाटात दुर्गाडीच्या (मनमोहनगड) पायथ्याशी दुर्गम भागात मानट वस्ती ही सुमारे १५० लोकसंख्येची कौलारू घरांची वस्ती. बहुतेक रहिवाशांचा उदरनिर्वाह पावसाळी शेतीवर अथवा मजुरीवर. वस्तीवर जायला केवळ कच्चा रस्ता. वीज नसल्याने रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागे. विजेपासून वंचित राहिलेल्या या वस्तीत वीज पोहोचवण्याचा संकल्प महावितरणने काही महिन्यांपूर्वी केला आणि तो मंगळवारी (१७ एप्रिल) पूर्णत्वास नेला. दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेतून या वस्तीपर्यंत वीज नेण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. त्यात तब्बल 63 उच्चदाब वाहिनीचे खांब, 69 लघुदाब वाहिनीचे खांब रोवण्यात आले आणि दुर्गाडीपासून मानट वस्तीपर्यंत जवळपास 9 कि.मी. विद्युत वाहिनी उभारण्यात आली. वस्तीवर एक 100 केव्हीए क्षमतेचे वितरण रोहित्र बसवण्यात आले. अर्थात हा प्रवास सोपा नव्हता. डोंगराळ भाग असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्ता नाही. त्यामुळे खांब नेण्याचे मोठे आव्हान होते. तथापि, महावितरण व कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी हे आव्हान यशस्वीरीत्या पेलले. त्यांनी शिकाळी करून खांद्यावर खांब वाहून नेले. वस्तीवर काही अंतर बैलगाडीतून रोहित्र नेण्यात आले. जिथे बैलगाडीही जाऊ शकत नव्हती त्या ठिकाणी लोखंडी चाकांची गाडी करून रोहित्र नेण्यात आले. त्यात स्थानिकांनीही सहकार्य केले. या कामासाठी दोन महिने लागले. काम पूर्ण झाल्यावर 14 घरांना वीजजोडण्या देण्यात आल्या. वीज आल्यानंतर घरांबरोबरच येथील रहिवाशांचेही चेहरे आनंदाने उजळले.
महावितरणच्या बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता नागनाथ इरवाडकर, बारामती मंडलाचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय पडळकर, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता  भाऊसाहेब इवरे, सासवडचे कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण, हिर्डोशीचे शाखा अभियंता विजय होळकर, प्रधान तंत्रज्ञ अशोक कुऱ्हाडे, वरिष्ठ तंत्रज्ञ जयसिंग तुंगतकर तसेच महावितरणचे कंत्राटदार सुरेंद्रकुमार अग्रवाल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मानट वस्तीवर वीज पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला.
 
वीज आल्याचा आनंद आमच्या वस्तीत रॉकेलवर चालणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात रात्र काढावी लागे. रॉकेल आणायलाही दुर्गाडीपर्यंत 4 ते 5 कि.मी. पायपीट करावी लागे. आता महावितरणने वीज दिल्यामुळे ही अडचण दूर होईल. विद्यार्थ्यांनाही अभ्यास करण्यास अडचणी येत होत्या. ते आता रात्री बल्बच्या उजेडात अभ्यास करू शकतील.