शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (11:23 IST)

पर्यटकांसाठी एमटीडीसी सज्ज, पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू

राज्य शासनाच्या आदेशानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) आपली निवासस्थाने सुरू केली आहेत. त्यानुसार पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू करण्यात आली असून ऑनलाइन बुकिं गची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
महामंडळाने कोरोना नंतरच्या काळात तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. टाळेबंदी काळातही एमटीडीसीच्या कर्मचाऱ्यांनी निवासस्थानांच्या खोल्या, परिसर स्वच्छ ठेवत निवासस्थानांची दुरुस्तीही केली आहे. पर्यटक निवासस्थानांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून उपाहारगृह आणि अनुषंगिक बाबींची स्वच्छता करण्यात आली आहे. या निवासस्थानांचे पुढील वर्षभर निर्जंतुकीकरण सातत्याने करण्यात येणार आहे. यासह शरीर तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाइज करणारे स्प्रे, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण मोजणारे यंत्र अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
 
पर्यटकांची मागील प्रवासाची माहिती घेऊन त्यांची नोंद घेतली जात आहे. पर्यटकांना देण्यात येणाऱ्या खोल्यांचे त्यांच्यासमोरच सॅनिटायझेशन केले जाते. अशाप्रकारे करोना संसर्गाबाबत सर्व प्रकारची आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.
 
याबाबत पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, ‘आगामी काळात महामंडळ आणि पर्यटनस्थळांची प्रसिद्धीही देशी पर्यटकांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात येणार आहे. पुणे विभागातील पानशेत, कार्ला (लोणावळा), माथेरान आणि माळशेज घाट ही पर्यटक निवासस्थाने यापूर्वीच सुरू करण्यात आली असून महाबळेश्वर आणि भीमाशंकर पर्यटक निवास २४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आले आहेत. सध्या पर्यटकांचा महाबळेश्वरकडे मोठय़ा प्रमाणात कल दिसून येत आहे. करोनामुळे तीन महिने वाया गेले असून या कालावधीत झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळ व त्यांचे कर्मचारी पुढील काही महिने अतिरिक्त काम करणार आहेत.’
 
महामंडळाकडून पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजनांची माहिती संके तस्थळ आणि वॉट्स अ‍ॅप समूहाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.