रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (13:11 IST)

सरकारने जिम आणि हॉटेल चालकांना परवानगी द्यावी : रोहित पवार

देशात आणि राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. परंतु सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसंच यादरम्यान अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील हॉटेल चालकांना घरपोच सेवा देण्याची परवानगी देण्यात आली असली तर हॉटेल सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. 
 
तर दुसरीकडे जिम आणि क्लासेसवरही निर्बंध कायम आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी जर चालक काळजी घेण्यास तयार असतील तर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यास काय हरकत आहे, असा सवाल केला आहे.
 
“करोनाबाबत सरकार सर्व प्रयत्न करत असतानाही काहीजण नियमांकडं दुर्लक्ष करतात. पण लोकांची काळजी घेण्याची दक्षता हॉटेल, जिम, क्लास चालक घेत असतील तर त्यांना परवानगी देण्यास हरकत नाही, असं माझं व्यक्तिगत मत आहे. याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा,ही विनंती व घेतला जाईल असा विश्वास आहे,” असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
 
‘पुनश्च हरी ओम’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक जूनपासून राज्यात शिथिलतेचे पर्व सुरू केले खरे, पण त्या काळात मुंबई महानगर परिसर, औरंगाबाद, पुणे येथे रुग्णसंख्या वाढल्याने जून अखेरीस टाळेबंदीचे नवे पर्व सुरू करण्याची वेळ आली. जुलै महिन्यात राज्यभर विविध महानगरांत टाळेबंदी कठोर झाली. ऑगस्टमध्ये जनजीवन थोडे सुरळीत होऊ लागलं होतं. पण त्याचबरोबर करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही वाढते आहे. 
 
ऑगस्ट महिन्यात टाळेबंदी शिथिल करताना मॉल्स, व्यापारी संकुल, खासगी दुकाने, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे आता बाजारपेठा खुल्या झाल्या, व्यवसाय सुरू झाले. परंतु जिम, हॉटेल, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनलॉकच्या पुढील टप्प्यात सर्व धर्मीयांची धार्मिक स्थळे खुली करावीत, जिम-व्यायामशाळांवरील निर्बंध दूर करा अशा मागण्या सुरू झाल्या होत्या.