सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाणवर सव्वा कोटीची खंडणी उकळल्याचा आरोप, गुन्हा दाखल
विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस ज्यांच्यावर पेन ड्राइव्हचा `बॉम्ब`टाकून दहा महिन्यांपूर्वी राज्यात मोठी खळबळ उडवून दिली होती, ते विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर सव्वा कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा गुन्हा पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. ही बातमी सरकारनामाने दिली आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतरच्या दीड वर्षानंतर फडणवीस हे गृहमंत्री असताना हा गुन्हा नोंद झाला आहे. बीएचआर प्रकरणात जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देऊन खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झालेली आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे पोलिस अधिकाऱ्यांना दबावतंत्र वापरतात आणि आपल्या पदाचा गैरवापर करतात, याचा गौप्यस्फोट तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर प्रवीण चव्हाण यांनी बीएसआर प्रकरणात विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला होता. त्याशिवाय त्यांच्याकडे इतर अनेक महत्त्वाच्या विशेषत: आर्थिक गुन्ह्यांसंदर्भातील खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
त्यात प्रामुख्याने पुण्यात बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, शिवाजीराव भोसले सहकारी बँक, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे मोक्का केसेस, एज्युकेशन स्कॅम रमेश कदम, महेश मोतेवार फसवणूक अशा 22 गुन्ह्यांमध्ये ते विशेष सरकारी वकील होते.
Published - By- Priya Dixit