गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019 (16:24 IST)

राज्यातील ऐतिहासिक गड किल्ले येथे हेरिटेजच्या नावाखाली हॉटेल उभारणार, राज्यात संताप

राज्य सरकारने राज्यातील ऐतिहासिक गड आणि किल्ले याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर केले जाणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढली आहे. हे सर्व किल्ले आता करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी देण्यात येणार आहेत. या निर्णयानुसार ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय आहे.  यासोबतच यामुळे पर्यटन वाढवण्यात मदत होईल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.
 
राज्य मंत्रिमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी या नव्या धोरणाला मान्यता दिली आहे. एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकणार आहे. यानुसार आता  किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित केली जाणार आहे. पर्यटन सचिव विनिता वैद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्य मंत्रीमंडळाने नव्या धोरणाला संमती दिली आहे. हेरिटज पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे,”.
 
या निर्णयामुळे राज्यातील वातावरण तापले असून, अनेक दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या व्हिडीओ शेअर करत आपलं मत मांडलं आहे. “ज्या असंख्य मावळ्यांनी हे गडकोट राखण्यासाठी बलिदान दिलं त्यांचा हा अपमान आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. “डेस्टिनेशन वेडिंग कोणाला परवडणार आणि ज्यांना परवडणार त्यांना “आपल्या” इतिहासाची कितपत जाण आणि भान असणार?,” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, राष्टवादी पक्ष यास विरोध करतो आहे हा निर्णय आम्हाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 
 
शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना भाड्यावर देण्याचा निर्णय हे भांडवलशाही सरकार घेत आहे. हा शिवबांचा, आम्हा मावळ्यांचा अपमान आहे. धनदांडग्या उद्योगपतींसाठी सरकार इतिहास नामशेष करायला निघाले आहे. याद राखा गडकिल्ल्यांना हात लावाल तर...  असे मत धनंजय मुंढे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.