बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मराठीच्या ६वी, भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषा

मराठी माध्यमातील सहावीच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी गुजरातसमोर आणखी किती लाचारी पत्करणार, असा सवाल विरोधकांनी विचारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी या मुद्द्यावरुन गोंधळ घातल्याने विधान परिषदेचे कामकाज अर्धा तासासाठी तहकूब करावे लागले. शुक्रवारी विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यावर मराठी भाषा समितीचा पहिला अहवाल सादर केला जाणार होता.

यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी मराठी माध्यमातील सहावी इयत्तेच्या भुगोलाच्या पाठ्यपुस्तकात गुजराती भाषेचा वापर केल्याचा प्रकार सभागृहात निदर्शनास आणून दिला. यावरुन शिक्षण विभागातील गलथान कारभार समोर येतो. तसेच या पुस्तकांची छपाई अहमदाबादमधील श्लोक प्रिंट सिटी  येथे झाली. हा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
 
राज्यात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांच्या मार्फत सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक दिले जाते. रायगड जिल्ह्यातील म्हसळा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शाळेतही हीच पुस्तकं विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. यातील पाठ्यपुस्तकातील काही पानांवर गुजराती भाषेचा वापर केल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.