शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जुलै 2023 (09:24 IST)

Happy Birthday उद्धव ठाकरे म्हणतात, 'माझ्याविरुद्ध अख्खा भाजप, भाजपाला माझी भीती वाटतेय'

uddhav thackeray
राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या आवाज कुणाचा या पॉडकास्ट मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली.
 
या दुसऱ्या भागातही ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाला माझी भीती वाटतेय म्हणून ते पालिकेच्या निवडणुका घेत नाहीयेत असं ते म्हणाले.
 
सध्याचं सरकार हिंदुत्वाच्या नावाखाली दंगलीसारखे विषय राजकारणात आणतंय का, असं विचारल्यावर उद्धव ठाकरे यांनी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे, असं सांगितलं.
 
"बाळासाहेब ठाकरे यांनी 370 कलम हटवण्याला, समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला होता. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. आता तुम्ही करत असलेलं हिंदुत्व लोकांना कदापि सहन होणार नाही.
 
तेव्हा जनसंघाची किंवा यांची घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता त्याच्यात त्यांनी जोडलंय ‘एकच पक्ष’. जे मी आणि जनता कदापी मान्य करू शकत नाही. देश एक मान्य. एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही. "
 
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, "ते इतरांना अगदी खुलेआम भ्रष्टाचारी म्हणतात, त्यांची विटंबना करतात, त्यांना आयुष्यातून उठवतात आणि आयुष्यातून उठवून झाल्यानंतर ते आपल्या बाजूला मांडीला मांडी लावून बसवतात. हे हिंदुत्व नाहीये."
 
"हे राज्यकर्ते एकाच मतावर ठाम राहात नाही. माझ्यावर हिंदुत्व सोडलं असा आरोप होतो म्हणजे नक्की काय सोडलं हे सांगा. हिंदुत्व काही धोतर नाही. पाहिजे तेव्हा नेसलं पाहिजे तेव्हा सोडलं.
 
काँग्रेसच्या काळात इस्लाम खतरेमे अशा घोषणा दिल्या जायच्या आता हिंदूजनआक्रोश मोर्चे निघतात मग तुम्ही 9 वर्षात काय केलं?"
 
बंगळुरूमध्ये परिवार वाचवायला पक्ष एकत्र आले म्हणतात, मग तुम्ही खुर्ची वाचवायला एकत्र आला आहात. 9 वर्षात तुम्ही केलंत काय, राममंदिराचा प्रश्न कोर्टाने सोडवला, तुम्ही काय केलंत? असंही उद्धव यांनी म्हटलं.
 
'या सरकारमुळे देशाचा अफगाणिस्तान होईल'
"या सरकारने महागाई कमी केली नाही. त्यातली फक्त गाई घेतली. बाकी सगळं तसंच आहे. सर्वत्र केंद्राच्या कोणत्या योजनेचे फायदा झाला याची चर्चा झाली पाहिजे. दरवर्षी ते फक्त आश्वासनाचं मृगजळ दाखवतात. लोकांना पाय भाजत तिथंपर्यंत नेतात. मृगजळ पुढे जात राहातं. यांची सत्ता चालत राहाते."
 
या सरकारमुळे आपल्या देशाचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. एकाच पक्षाचं सरकार राहावं अशी भावना भाजपाची असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
 
उद्धव ठाकरेंनी दगा दिला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस का फोडला? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, "आवश्यकतेनुसार तुम्ही पक्षांना वापरता तसं लोकही तुम्हाला फेकतील. शिवसेनेतून मोठी माणसं बाहेर पडली पण ज्यांनी त्यांना मोठं केलं ती माणसं माझ्याबरोबर आहे. तुम्ही सेना फुटल्यावर लढलात."
 
पण राष्ट्रवादीत तसं दिसत नाही, असं विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "मी लढतोय, मी समोरासमोर लढतो. पवारसाहेबांना जनतेून जाऊन लढायचं असेल तर ते करु देत."
 
"भाजपाबरोबर सरकार असताना जे मंत्री राजीनामा देऊ पाहात होते तेच मंत्री आज भाजपाबरोबर गेले आहेत. राजीनामा खिशात घेऊन फिरतो म्हणणारेही निघून गेले. फुटीनंतरही पवारांकडे जसे नेते जातात तसे शिवसेनेतले नेते फुटल्यानंतर माझ्याकडे येऊच शकत नाहीत. त्यांच्यात ती हिंमत नाही."
 
‘ही लढाई लोकशाहीची’
महाविकास आघाडीची व्याप्ती आता वाढलेली आहे आणि त्याचंच रूपांतर आता देशभरात ‘इंडिया’ नावानं झालंय म्हणून इतर राज्यांतले जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यात काँग्रेस मोठा पक्ष आहेच, इतर पक्ष त्यात सामील झाले आहेत. कारण आता ही लढाई केवळ कोणत्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वाची नाही, देशाच्या लोकशाहीची आणि देशाच्या स्वातंत्र्याची आहे, असं उद्धव यांनी या मुलाखतीत म्हटलं.
 
राहुल गांधींबद्दलही उद्धव ठाकरेंनी आपली निरीक्षणं नोंदवली, मतं मांडली.
 
"राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज-गैरसमजच जास्त होते, ‘ते’ असे आहेत... ‘ते’ तसे आहेत... ‘ते’ हिंदुद्वेष्टे आहेत. प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की, राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत.
 
त्यांना जे काही वाटतंय ते हळुवारपणे बोलताहेत आणि नुसतं ऐकून घेत नाहीत, तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांच्या समोर मांडतातसुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिलं तर मला वाटत नाही की, पुढे काही अडचण येईल."
 
"आज माझ्याविरुद्ध अख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेता आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडे आहेच काय?
 
पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे, चिन्ह चोरलं आहे, माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? म्हणूनच मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत."
 
त्यांनी पुढे म्हटलं की, "भाजप पाडत असलेला पायंडा हा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच बनणार! असं जर का चालू राहिलं तर कठीण आहे.
 
ज्या पद्धतीने आता हे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालंय, ते कसं झालंय हे गावागावातलं अगदी साधं पोरसुद्धा सांगेल की कसे हे जन्माला आले आहेत. अशा पद्धतीने उद्या कोणीही... म्हणजे खोके सरकार म्हणतात त्याला... उद्या खोके घेऊन येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल."
 
‘भाजपात राम राहिलेला नाही’
"भाजपमध्येसुद्धा राम आता राहिलेला नाहीये. आहेत ते फक्त आयाराम आहेत. भाजपचा राम कधीच गेलेला आहे. आहेत ते फक्त आयाराम, बाकी गयाराम. हा सगळा आयारामांचा पक्ष आहे. तर आयारामांना तुम्ही सामावून घेताना मुळात तुमच्या पक्षातला जो राम होता, त्याला आता तुम्ही फक्त कामापुरता वापरणार का? की त्याला पण तुम्ही संधी देणार आहात."
 
उद्धव यांनी भाजपवर टीका करताना म्हटलं की, "त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती आहे, पण शक्तीचा आत्मविश्वास नाही. म्हणून ते सत्ता आहे तोपर्यंत अशा पद्धतीत राबवत आहेत, तेसुद्धा सरकारी यंत्रणेतून. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे बाजूला ठेवा आणि यांचे काय हाल होतील ते बघा...
 
माझी त्यांना भीती वाटतेय. शिवसेनेची भीती वाटतेय त्यांना, म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीत."
 
आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेच्या 92 हजार कोटींच्या ठेवी आपण निर्माण करून दिल्या. त्या सगळ्या रिकाम्या करायच्या. जो आता भ्रष्टाचार सुरू आहे तो त्या ठेवी रिकाम्या करण्याचाच आहे आणि मग मुंबईला भिकेचा कटोरा देऊन जसे आज हे दिल्लीला मुजरे मारायला गेलेत तसे दिल्ली दरबारी मुजरे करायला बोलवायचे, असंही त्यांनी म्हटलं.
 
"मग मुंबईची जी स्वायत्तता आहे ती त्यांना मारायची आहे. नुसतीच मुंबई शिवसेनेकडून हिसकवायची नाही तर मुंबई आपल्या अंगठय़ाखाली ठेवायची आणि त्यासाठीसुद्धा त्यांना लोढाच सापडला. म्हणजे बिल्डरच्या हातात तुम्ही मुंबई देताय? पालकमंत्री म्हणून मग दुसरा कुणी पालकच नाही का मुंबईला? मंत्री म्हणून त्याचं ऑफिस तुम्ही तिकडे ठेवताय, मग महापौरांचं दालन तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का? महापौर मुंबईचा आहे... मंत्रालय मुंबईत आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. मग त्या मुंबईच्या महापौराचं दालन तुम्ही मंत्रालयात ठेवणार आहात का मुख्यमंत्र्यांच्या बाजूला?"
 
"एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी तुम्हाला दोघांना वाचवलं होतं. माननीय पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना... त्याचे पांग तुम्ही असे फेडताय का? आणि मला संपवण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा. बघू या माझ्या वडिलांचे आशीर्वाद, जनतेची सगळी साथसोबत आणि तुमची ताकद माझ्या पाठीशी आहे. "
 
उद्धव यांनी म्हटलं की, ईव्हीएमची गरजच राहिली नाही. तुम्ही मत कोणालाही द्या... सरकार माझंच होणार. त्यामुळे आता ईव्हीएम वगैरे मुद्दे कालबाह्य झाले. ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडून आलेले लोक तुम्ही धाकदपटशा दाखवून जर का फोडून तुमच्याकडे घेत असाल, मग ईव्हीएमची पण गरज नाही ना?
 
‘एनडीएचा पराभवच करावा लागेल’
"इंडियाला एनडीएचा पराभव करावाच लागेल आणि मी करणारच. हे होऊ शकतं हे दाखवून द्यावंच लागेल.
 
महाराष्ट्राच्या लोकांना मी हेच सांगेन की, आपल्यावर जो संस्कार आहे तो संस्कार जपला पाहिजे. ते जे करताहेत तो आपला संस्कार नाही, ती आपली संस्कृती नाही. रोज उठसूट दिल्लीला मुजरा मार ही आपली संस्कृती नाहीच आणि कोणाच्याही धाकदपटशाला बळी पडणं ही आपली संस्कृती नाही. मग ती जर का संस्कृती मानणार नसू तर आपल्याला 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' बोलायचा अधिकार नाही."
 
कोविड काळात संपूर्ण जग एका भीतीच्या वातावरणात होतं आणि तेव्हा महाराष्ट्राने आणि मुंबईने एक ‘मुंबई मॉडेल’ जगाला दाखवलं, ज्याचं कौतुक हे सातासमुद्रापलीकडेसुद्धा झालं, सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा केलं. एक मनाचा दिलदारपणा पाहिजे, मोठेपणा पाहिजे की जे तुम्ही करू शकला नाहीत ते माझ्या मुंबईने केलं. पण त्याचं कौतुक करायचं तर सोडाच, पण तुमचं जगभरात नाव झालं काय? आमचं नाही झालं काय? म्हणून तुमचं नावसुद्धा आम्ही बदनाम करू. ही जी घाणेरडी वृत्ती आहे... ही संस्कृती आपली नाहीये...
 
"नेताजी सुभाषचंद्रांचा पुतळा दिल्लीमध्ये उभारला गेला. त्यांच्या कन्या मला वाटतं जर्मनीत राहतात आणि त्यांनी सांगितलं होतं की, सुभाषबाबू डाव्या विचारसरणीचे... तुम्ही उजव्या विचारसरणीचे... पहिली विचारसरणी तुम्हाला मान्य आहे का? वल्लभभाईंचा पुतळा उभा केला... म्हणजे पुतळे उभे करून दुसऱयांचे आदर्श चोरायचे... तेच चाललंय. बाळासाहेबांना चोरण्याचा प्रयत्न हा त्याचाच एक भाग आहे. "