हसन मुश्रीफ यांनी जावयाच्या जयोस्तुते कंपनीला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं-किरीट सोमय्या
राष्ट्रवादी काँग्रेसचा आणखी एक बडा नेता लवकरच तुरुंगात जाणार असं विधान त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केलं होतं. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
सोमय्या यांनी एक व्हिडीओ जारी करत म्हटलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी मंत्री असताना स्वत:च्या जावयाच्या जयोस्तुते कंपनीला १५०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. हा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला होता. या प्रकरणाची आता लोकायुक्तांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी आज ट्वीट करत यासंदर्भातील एक पत्रही शेअर केलं आहे. त्यानुसार, हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित जयोस्तुते प्रा. लि. कंपनीला दिलेल्या कंत्राटाचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांचे रिटर्न्स भरण्यासाठी देण्यात आलेल्या १५०० कोटींच्या कंत्राटात झालेल्या घोटाळ्याची चौकशी लोकायुक्तांकडून सुरू करण्यात आल्याचं म्हटलं आहे.