गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 डिसेंबर 2023 (08:19 IST)

एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह लिमिटेड बँकेत 12 संचालकांचा तडकाफडकी राजीनामा

gunratna sadavarte
प्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी महामंडळातील अस्तित्वाला फार मोठा धक्का बसला आहे. एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये भूकंप झाला आहे. एसटी बँकेच्या 19 पैकी 12संचालकांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
 
त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना मोठा धक्का बसला आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळातील सदावर्ते यांचं वर्चस्व खालसा झालं आहे. या राजीनामा सत्रामुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.
 
एसटी कर्मचा-यांच्या संपावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी आधी कर्मचा-यांचे वकीलपत्र घेतले होते. त्यानंतर त्यांनी या कर्मचा-यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यानंतर एसटी महामंडळाच्या निवडणुकांमध्ये आपले पॅनलही उतरवले. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने एसटी बँकेची संचालक मंडळाचा निवडणूक लढवली. या निवडणुकीत सदावर्ते यांच्या पॅनलला 19 पैकी12 जागांवर विजय मिळाला. मात्र, कुरबुरी काही थांबेनात. अखेर या कुरबुरीचा कडेलोट झाला.
 
एसटी बँकेच्या 19 पैकी 12 संचालकांनी पदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व संचालकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलला सोड चिठ्ठी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. हे सर्वच्या सर्व १२ संचालक ट्रॅव्हलरमधून एसटी बँकेत पोहोचले. यावेळी त्यांनी सोबत राजीनामा पत्रही आणले होते. या संचालकांनी एसटी महामंडळाचे अतिरिक्त संचालक बिमनवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त आहे. या १२ संचालकांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता एसटी बँकेत पुन्हा एकदा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
घोटाळ्याचा आरोप
स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक अर्थात एसटी बँकेत ४५० कोटींचा घोटाळा झाल्याचा संचालकांचा आरोप आहे. त्यामुळे संचालकांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वीच १४ संचालक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर आज या संचालकांनी थेट राजीनामा अस्त्र उगारल्याने सदावर्ते यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor