मुंबई सावधान पाऊस आज २४ तासात कोसळणार जोरदार
केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) राज्यातील काही भागात पुढील 3 दिवसांत पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली असून, उत्तर तसेच दक्षिण गोवा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक नद्यांना पूर येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सोबतच काही लहान धरणे ओव्हरफ्लो होऊन फुटण्याची शक्यताही वर्तवली आहे. मुंबईसह ठाणे आणि रायगडमध्ये पुढील २४ तासात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. संध्याकाळी ७ वाजल्यापासून अंधेरीत 36 मिमी, दादरमध्ये 20 मिमी तर कुर्ल्यात 22 मिमी पावसाची नोंद झाली. अंधेरी सबवेमध्ये पाणी भरल्याने हा सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. भांडुपमध्ये एलबीएस मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने पाणी भरले होते. दादर पूर्व, हिंदमाता, किंग्जसर्कल येथेही पाणी भरले होते. मध्य, हार्बर आणि पश्चिम या मार्गांवरील लोकलसेवा सुरळीत आहे. तर रस्ते वाहतूक मात्र मंदावली. मध्यरात्री सुद्धा मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. शहर आणि उपनगरातील सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाल्यानं काही ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. भांडूप, अंधेरी, दादर, हिंदमाता, वांद्रे, माटुंगा, वडाळा, चर्चगेट या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे.