शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 2 एप्रिल 2022 (10:54 IST)

पालघर साधू हत्याकांडप्रकरणी 10 जणांना हायकोर्टाकडून जामीन

पालघर साधू हत्याकांड प्रकरणी 10 आरोपींची ओळख न पटल्यानं जामीन मंजूर करत असल्याचं हायकोर्टानं अधोरेखित केलं आहे. अन्य आठ आरोपींचा त्या हल्ल्यात सहभाग असल्याचं पुराव्यांनिशी निष्पन्न होत असल्याचं स्पष्ट करत त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.  
 
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ 16 एप्रिल 2020 रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेमुळे गस्त घालणाऱ्या जमावाकडून काही जणांवर हल्ला करण्यात आला. चोर समजून गुजरातमधील सुरत इथं अंत्यसंस्कारासाठी चाललेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची निर्घूणपणे दगडांनी ठेचून हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासानंतर पालघर पोलिसांकडून हे प्रकरण राज्य गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं.
 
याप्रकरणी शेकडो जणांना अटक करून त्यांच्यावर ठाणे सत्र न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयातही राज्य सरकारकडून दोन सीलबंद अहवाल सादर करण्यात आलं आहेत. त्यापैकी काहींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला होता.